नगरपंचायत सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरपंचायत सभा
नगरपंचायत सभा

नगरपंचायत सभा

sakal_logo
By

बाबा गार्डनचे सुशोभीकरण, रामलिंग तलावाचे संवर्धन करणार
चंदगड नगरपंचायतीच्या मासिक बैठकीत निर्णय

चंदगड, ता. १६ ः शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या बाबा गार्डनचे सुशोभीकरण करण्याबरोबरच रामलिंग तलावाचे संवर्धन करण्याचा निर्णय आज येथील नगरपंचायतीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. नगराध्यक्षा प्राची काणेकर अध्यक्षस्थानी होत्या.
प्रारंभी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तसेच आदिवासी नायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी स्वागत करुन विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये महत्वाचे स्थान असलेल्या रामलिंग तलावाची संरक्षक भिंत कोसळत आहे. त्यामुळे तलावात गाळ साचून पाणी साठवण क्षमतेवर मर्यादा येत आहे. त्यामुळे या तलावाची दुरुस्ती आणि संवर्धन करणे गरजेचे असल्याबाबत चर्चा झाली. शहरातील आबालवृध्दांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून बाबा गार्डनकडे पाहिले जाते. इथे दिवसभरात अनेक नागरिक भेट देतात. या गार्डनचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात आलेला वीज पंप सातत्याने बंद पडत असल्याने पाणी पुरवठ्यावर मर्यादा येतात. त्यासाठी नवीन मोटर व पंपिंग मशीन खरेदी करण्याचा ठराव झाला. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा ३.० अंतर्गत विविध कामे करण्याबाबत शहराचा प्रारूप आराखडा प्रसिध्द करण्याचे ठरले. नवीन चतुर्थ वार्षिक कर आकारणीबाबत माहिती देण्यात आली. समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रावर तसेच वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत कामांवर चर्चा झाली. नगरपंचायतीच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला. उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक अभिजित गुरबे, मेहताब नाईक, झाकीरहुसेन नाईक, नेत्रदीपा कांबळे, अनुसया दाणी, अनिता परीट, माधुरी कुंभार, संजीवनी चंदगडकर, शिवानंद हुंबरवाडी, मुमताज मदार, आनंद हळदणकर, दिलीप चंदगडकर, नूरजहॉं नाईकवाडी, प्रमिला गावडे, संजना कोकरेकर, सचिन नेसरीकर, अॅड. विजय कडूकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. अधीक्षक श्रीराम डाके यांनी आभार मानले.