चंदगडच्या जंगलात कर्नाटकचे शिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडच्या जंगलात कर्नाटकचे शिकारी
चंदगडच्या जंगलात कर्नाटकचे शिकारी

चंदगडच्या जंगलात कर्नाटकचे शिकारी

sakal_logo
By

चंदगडच्या जंगलात कर्नाटकचे शिकारी
अत्याधुनिक हत्यारे; नव्याने शिरकाव, पंधरा-वीस जणांचे समूह कार्यरत
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २० : वन्य जीव कायद्यांतर्गत शिकारप्रकरणी दाखल होणाऱ्या गुन्ह्यांना घाबरून चंदगड तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार जवळजवळ बंद झाली आहे, परंतु अलीकडच्या काळात शेजारच्या कर्नाटक राज्यातून इकडे येऊन शिकार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शिकारीसाठी वापरण्यात येणारी महागडी वाहने, अत्याधुनिक हत्यारे आणि पंधरा-वीस जणांचा समूह विचारात घेता व्यावसायिक किंवा चंगळवादी मनोवृत्तीच्या श्रीमंताकडून हे प्रकार होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
चंदगड तालुका हा डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. १९४० च्या दशकापर्यंत या विभागात वाघ, बिबटे, अस्वल, सांबर, भेकर, डुक्कर यासह हत्तींचासुध्दा वावर असल्याचे पुरावे आहेत. येथील कै. गोविंद गणेश दाणी (मास्तर) हे पट्टीचे शिकारी होते. त्यांनी केलेल्या शिकारीच्या नोंदीमध्ये या प्राण्यांचा समावेश आहे. इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर कर्नाटकातील खानापूर, गदगपर्यंत जाऊन त्यांनी शिकारी केल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर वन्य जीव कायद्यांचा अंमल सुरू झाला, तरीही सन २००० पर्यंत डुक्कर, भेकर, ससे, साळींदर आदी प्राण्यांची शिकार होतच होती. मधल्या काळात वन विभाग आणि पोलिस खात्याकडून जोरदार कारवाई झाल्याने बहुतांश शिकाऱ्यांनी आपली हत्यारे म्यान केली. त्याचा लाभ कर्नाटकातील शौकिनांनी उठवला आहे. अर्थात त्यांना काही प्रमाणात स्थानिक शिकाऱ्यांची मदत आहेच. चंदगड तालुक्याची हद्द कर्नाटकला जिथे भिडते, तो तिलारीनगर, म्हाळुंगे, तुडीये, कोलीकचा भाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. या जंगलात विविध जातींचे वन्यजीव आहेत. तालुक्याच्या एका टोकाला असलेल्या या भागात वन विभाग आणि पोलिसांचीही गस्त फारशी नसते. त्याचा लाभ शिकाऱ्यांकडून उठवला जातो.
तुडीये परिसरात अटक केलेले शिकारी, त्यांच्याकडील किमती वाहने आणि अत्याधुनिक रायफल व इतर हत्यारे पाहता एकतर ते व्यावसायिक पध्दतीने शिकार करतात किंवा चंगळवादी मनोवृत्तीचे श्रीमंत लोक असण्याची शक्यता आहे. त्यांनी वापरलेल्या रायफलला दूरचे भक्ष्य टिपण्यासाठी दुर्बिण आहे. त्यांच्या टोळीमध्ये एकजण शार्प शूटर असून, सावज टीपणे एवढेच त्याचे काम. ते झाले की त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी इतरांवर असते. नियोजनबध्द पध्दतीने शिकारीचे काम करणारे श्रीमंत शौकीन किंवा व्यावसायिक शिकारीच असले पाहिजेत. दोघांना अटक होताच अवघ्या तासभरात त्यांच्यातर्फे वकील हजर होतो, यावरून हे स्पष्ट होते.
------------
चौकट
तपासात भाषेचा अडथळा...
वन विभागाकडे अटकेत असलेल्या संशयितांना मराठी येत नाही, तर तपासी अधिकाऱ्यांना कन्नड कळत नाही. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. कन्नड येणाऱ्या स्थानिक वन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तपास सुरू आहे. या कामी कर्नाटकचे पोलिस किंवा वन खाते सहकार्य करीत नसल्याचे येथील वन विभागाचे म्हणणे आहे.