गावांचा विकास होणार तरी कधी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावांचा विकास होणार तरी कधी ?
गावांचा विकास होणार तरी कधी ?

गावांचा विकास होणार तरी कधी ?

sakal_logo
By

गावांचा विकास होणार तरी कधी ?
सत्तेच्या राजकारणात विकासाकडे दूर्लक्ष; निवडणूक प्रचारात वर्षानुवर्षे तेच मुद्दे
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ७ ः तालुक्यातील चाळीस गावांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यानिमित्ताने गावच्या विकासाचे मुद्दे मांडले जात आहेत. प्रचार अजेंडा पाहता इतक्या वर्षापासून अजूनही रस्ते, पाणी आणि आरोग्य सेवेचीच आश्वासने दिसून येत आहेत. या मुद्यांची परीपूर्णता करुन गावचा विकास पुढच्या टप्यावर कधी पोहचणार असा प्रश्न नव्या पिढीतील मतदार विचारत आहेत.
पक्के रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य केंद्र, सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारी, शाळा, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय आदी तेरा नागरी सुविधांनीयुक्त वसाहत आदर्श मानली जाते. मात्र आजही अनेक गावातील अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारे रस्ते कच्चे आहेत. पाण्याचे योग्य व्यवस्थापन नाही. एकाही गावात नळपाणी योजनेला फिल्टरेशन प्लांट नाही. गटारींचे सांडपाणी थेट नदीत मिसळते. शोषखड्याबाबत उदासिनता आहे. अजूनही काही गावांना ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयाची इमारत नाही. शाळांच्या इमारती मोडकळीला आल्या आहेत. शाळेचा दर्जात्मक उठाव कसा करता येईल याबाबत नियोजन नाही. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये अनुभवी आणि योग्य व्यक्तींना संधी नाही. केवळ राजकीय हेतूने कार्यकरर्त्यांची वर्णी लावली जाते. हीच अवस्था तंटामुक्त समितीची आहे. या समितीकडून न्याय मिळेल ही अपेक्षा फेल गेली आहे. 
गावात सामाजिक सलोखा निर्माण करावा, स्पर्धा परीक्षेपर्यंतच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्या, प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवावेत असे प्रयत्न फारसे दिसून येत नाहीत. किरकोळ कारणावरुन भाऊबंदकी, शेजाऱ्यांत न्यायालयीन वाद आहेत. योग्य समुपदेशनातून ते सहज सुटू शकतात.
------------
नागरिकांनी कर्तव्य निभावण्याची गरज
विविध प्रकल्पामुळे उपलब्ध पाणी आणि बदललेली पिक पध्दती पाहता शेतातून दळणवळणासाठी रस्त्यांची गरज आहे. तरुणांच्या हाताला काम मिळेल यासाठी स्थानिक शेतीमालावर आधारीत रोजगार निर्मिती, उत्तम आरोग्यासाठी व्यायामशाळा, नदीघाटाच्या माध्यमातून पोहण्यासाठी सुरक्षितता निर्माण करता येते. परंतु सत्तेच्या राजकारणात याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता नागरीकांनीच आपले कर्तव्य निभावण्याची गरज आहे. गावाला योग्य दिशा देणाऱ्या व्यक्तींना निवडून द्यायला हवे. गुप्त मतदान पध्दतीने मतदाराला मोठा आधार दिला आहे. त्याचा वापर केला तरच गावचे गावपण टिकण्याबरोबरच त्याला नवे रुपही धारण करणे शक्य होईल.