
चंदगडला वीरपत्नीचे उपोषण सुरू
02198
चंदगड ः अव्वल कारकून विलास पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर वीरपत्नी शोभा पाटील यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले.
--------------------------------
चंदगडला वीरपत्नीचे उपोषण सुरू
शासकीय योजनेतून जमीन; चाळीस वर्षे झाली तरी महसूलकडून मोजणी नाही
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ९ ः येथील वीरपत्नी श्रीमती शोभा शिवाजी पाटील यांनी शासनाच्या सिलिंग योजनेतून जाहीर झालेल्या जमिनीची कब्जेपट्टी मिळावी या मागणीसाठी आजपासून येथील तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आठ दिवसांपूर्वी माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले होते. परंतु महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आज त्यांनी आंदोलनाला सुरवात केली. सांयकाळी अव्वल कारकून विलास पाटील यांनी मोजणीबाबत लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतले.
पाटील यांचे पती शिवाजी कृष्णा पाटील हे सैन्यदलात राजस्थान (कोटा) येथे कार्यरत असताना शहीद झाले. भारत सरकारने त्यांना मरणोपरांत कीर्तीचक्र प्रदान केले. महाराष्ट्र शासनानेही महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला. ते ह्यात असताना १९७६ मध्ये त्यांना सिलिंगमधून जमिन मिळाली. परंतु त्याची मोजणी करुन प्रत्यक्ष कब्जेपट्टी देण्यासाठी चाळीस वर्षे उलटली तरी महसूल प्रशासनाकडे वेळ नाही. आजही तहसिलदार विनोद रणावरे यांनी आंदोलकांना हा प्रश्न माझ्या अख्त्यारीत नसून मोजणी विभागाचा असल्याचे सांगितले. भूमी अभिलेख कार्यालयाकडून १९ तारखेला मोजणी करण्याचे तोंडी आश्वासन दिले.
दरम्यान सायंकाळी उशिरा अव्वल कारकून विलास पाटील १९ तारखेला मोजणी करण्याचे लेखी आश्वासन घेऊन आले. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु त्या दिवशी निर्णय प्रलंबित राहिल्यास २० तारखेपासून पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेतर्फे दिला. यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हा संघटक कुमार पाटील, संजय जाधव, रणजित गावडे, दशरथ पाटील, राजाराम फडके, सुरेश दळवी, यशवंत धावसकर, चंद्रकांत गवस, जोतिबा पाटील, विठोबा गावडे, सुरेश मेटकुपी, सचिन सावंत उपस्थित होते.