ठाकरे सरकारकडून पुरस्कार; ‘शिंदे’ कडून निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे सरकारकडून पुरस्कार; ‘शिंदे’ कडून निधी
ठाकरे सरकारकडून पुरस्कार; ‘शिंदे’ कडून निधी

ठाकरे सरकारकडून पुरस्कार; ‘शिंदे’ कडून निधी

sakal_logo
By

ठाकरे सरकारकडून पुरस्कार; ‘शिंदे’ कडून निधी
माझी वसुंधरा अभियान; चंदगड नगरपंचायतीला एक कोटीचा सुखद धक्का
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ९ ः येथील नगरपंचायतीला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मिळालेल्या पुरस्कारापोटी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला. जूनमध्ये तत्कालीन ठाकरे सरकारने त्यांना पुरस्कार दिला होता. विद्यमान शिंदे सरकारने निधीची रक्कम जाहीर करुन सुखद धक्का दिला. यामुळे शहराच्या विकासाला आणखी चालना मिळणार असल्याची प्रतिक्रीया नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी व्यक्त केली.
माझी वसुंधरा २.० अंतर्गत चंदगड नगरपंचायतीने पुणे विभागात नगरपंचायत गटामध्ये अतिउत्कृष्ट कामगिरी बजावली होती. ५ जूनला जागतिक पर्यावरणदिनी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नगराध्यक्षा काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानित केले होते. त्यावेळी केवळ पुरस्कार दिला होता. त्यापोटी मिळणारी रक्कम किती असेल याची घोषणा केलेली नव्हती. दरम्यानच्या काळात राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे सरकार अस्तित्वात आले. या सरकारने या पुरस्काराची रक्कम जाहीर केली. तब्बल एक कोटी रुपये जाहिर होताच पदाधिकाऱ्यांना सुखद धक्का बसला.
माजी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून शहरासाठी यापूर्वीही चांगला निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून अनेक विकासकामे राबवली आहेत. त्यातच या पुरस्काराने पदाधिकाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे. या रक्कमेतून तळ्याचे सुशोभिकरण, सौर उर्जेवरील पथदिवे आणि सेल्फी पॉईंटचे दर्जेदार काम पूर्ण करुन चंदगड शहराला आणखी सुंदर करणार असल्याचे काणेकर यांनी सांगितले. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षातच शहराच्या विकासासाठी शासनाकडून मिळालेला निधी आणि या पुरस्काराच्या रक्कमेमुळे नगरवासीयांतूनही समाधान व्यक्त होत आहे.
-----------------
शहरात विविध विकासकामे राबवत असताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली. त्याची राज्य स्तरावर दखल घेऊन पुरस्कार जाहीर झाला. नव्या सरकारने निधी देऊन त्यावर कळस चढवला. यामुळे शहर विकासाला चालना मिळेल.
- प्राची काणेकर, नगराध्यक्षा, चंदगड