
ब्लॅक पॅंथरतर्फे चंदगडला आजपासून ठिय्या
ब्लॅक पॅंथरतर्फे चंदगडला आजपासून ठिय्या
चंदगड ः येथील तहसील कार्यालयाकडून विविध शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्याकडे दुर्लक्ष, तसेच काही सामाजिक प्रश्नात योग्य भूमिका घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ ब्लॅक पॅंथरतर्फे सोमवार (ता. २०)पासून येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी याबाबत निवेदन दिले. डुक्करवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व झेंड्याला परवानगी दिली नाही. भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांना घरकुल मिळण्याबाबत तसेच सर्वसामान्य मागासवर्गीयांना राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून कर्ज नाकारत असल्याबाबत पक्षाने तहसीलदारांना निवेदने दिली होती. मात्र, त्यांनी त्याला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. जोपर्यंत यासंदर्भात योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. निवेदनावर भिकाजी कांबळे, सुरेश कांबळे, विजय कांबळे, प्राची कांबळे, महादेव कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.