चंदगडचा शिमगोत्सव लोकोत्सवाच्या दिशेने

चंदगडचा शिमगोत्सव लोकोत्सवाच्या दिशेने

चंदगडचा शिमगोत्सव लोकोत्सवाच्या दिशेने
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ : अल्पशिक्षित आणि उच्चशिक्षित, मजूर ते अधिकारी- पदाधिकारी, लहानांपासून थोरापर्यंत सर्वांचाच सहभाग. काळ बदलला त्यानुसार प्रथा परंपराही बदलल्या असे म्हटले जात असताना चंदगडवासियांनी शिमगोत्सवाचा बाज यावर्षी अबाधित ठेवला. होळी पौर्णिमेला सुरू झालेला उत्सव गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी जागर आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळून संपतो. जागराला प्रत्येक गल्लीचे पारंपारिक सोंग निघते. यावर्षीही त्यात खंड पडला नाही. जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन समाजाच्या सांघिकतेचे दर्शन घडले.
ढोल आणि ताशाच्या विशिष्ट तालावर ठेका धरणारे राम, सीता, लक्षमणादी पात्रे तसेच नांगर उंचावून जोशात फिरणारा बलराम, बासरीधारी श्रीकृष्ण हा पारंपारिक प्रसंग प्रत्येक सोंगासाठी आवश्यकच. त्याशिवाय कला दाखवण्यासाठी दिग्दर्शक आणि कलाकाराला मुक्त वाव. डोकीवर रेणुका देवीचा जग घेतलेली, तिच्यापुढे अंगाला आडेवेडे देत घुमणाऱ्या आणि हातात पडली घेऊन प्रत्येकाच्या कपाळाला हळद लावणाऱ्या जोगिणींचा संच, आधुनिक पेहराव करून नृत्य करणाऱ्या तरुणींचा जथ्था. पोस्त (शिकार) घडल्यानंतर त्याची काढली जाणारी मिरवणूक, प्रज्वलित चेहऱ्याने दाखल झालेली रेणुका माता, गुलाबाच्या फुलात विसावलेली आणि हातात वीणा घेऊन प्रकट झालेली सरस्वती, अस्वलाला घेऊन फिरणारा दरवेशी, चिलीमीतून धूर काढणारा जटाधारी साधू आणि दिलखेच अदाकारी करणारी लावण्यवती साकारली ती या मुक्त कलाकारीतून. त्यांच्या जोडीला आबाल श्रीकृष्ण, हनुमान आणि वानरसेना होतीच.
रवळनाथ गल्ली, ब्राह्मण गल्ली, गांधीनगर, इलगे गल्ली व कुंभार गल्लीतील कलाकारांनी प्रदर्शन घडवले. संभाजी चौक ते कैलास चौकापर्यंत प्रत्येक सोंग विशिष्ट अंतरावर थांबून पुढे सरकत होते. त्यांच्याबरोबर हजारो प्रेक्षकांचा प्रवाह स्वयंशिस्तीने पुढे वाहत होता. त्यासाठी पोलिसांची गरज लागली नाही. रात्री आठ ते पहाटे चारपर्यंत चाललेल्या मिरवणुकीत वाजप्यांचा जोश आणि कलाकारांचे लयबद्ध नृत्य कायम होते. यावर्षीची गर्दी पाहता त्याची वाटचाल लोकोत्सवाच्या दिशेने सुरू असल्याचे सिद्ध झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com