
दौलत कामगार देणी
‘दौलत’च्या निवृत्त कामगारांचा
दुसरा हप्ता खात्यावर जमा
चंदगड, ता. १० : हलकर्णी ( ता. चंदगड ) येथील दौलत कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांच्या देय रक्कमेपैकी दोन कोटी रुपयांचा दुसरा हप्ता अथर्व इंटरट्रेड कंपनीकडून संबंधित कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
२०११ मध्ये हा कारखाना बंद पडला होता. या दरम्यान अनेक कामगार निवृत्त झाले. मात्र त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी, पगार आदी रकमा थकीत होत्या. मधल्या काळात काही कंपन्यांनी कारखाना चालवायला घेतला; मात्र कामगारांच्या देय रकमेबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही. तीन वर्षांपूर्वी अथर्व इंटरनेट कंपनीने हा कारखाना चालवायला घेतला. त्यावेळी त्यांनी निवृत्त कामगारांच्या देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्यावर्षी ७५ लाख रुपये आणि यावर्षी दोन कोटी रुपयांची रक्कम संबंधित कामगारांच्या खात्यावर वर्ग केली आहे. कंपनीच्या या निर्णयाबद्दल कामगार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या संदर्भात कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे म्हणाले, ‘कामगारांची थकीत देणी आश्वासन दिल्याप्रमाणे पूर्ण केली आहेत. यापुढील काळात कामगार, शेतकरी, सभासद या सर्वांचे सहकारी अपेक्षित आहे.’