
साऊंड सिस्टीम जप्त
वरातीतील साऊंड सिस्टीम जप्त
कडलगे खुर्द येथे नवरदेवासह चौदा जणांवर गुन्हा दाखल
चंदगड, ता. १२ ः कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथे विना परवाना साऊंड सिस्टीम लावून वरात काढणाऱ्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले. नवरदेव, त्याचे वडील, वधूचे वडील यांच्यासह चौदा जणांवर ध्वनी प्रदूषणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. साऊंड सिस्टीम, दोन ट्रॅक्टर, ट्रॉलीसह जनरेटर जप्त करण्यात आले. गुरुवारी (ता. ११) रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.
कडलगे येथील परशराम मारुती बिर्जे यांच्या मुलीचे लग्न सुंडी येथील अशोक मारुती पाटील यांचा मुलगा वैजनाथ याच्याशी झाले. लग्नानंतर साऊंड सिस्टीमवर वरात काढली जात होती. कर्णकर्कश आवाजात गाणी लावून त्यावर अनेकजण नृत्य करीत होते. याबाबत येथील पोलिस ठाण्याकडील अंमलदार अमोल देवकुळे यांनी स्पिकर परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. साऊंड सिस्टीम बंद ठेवण्याची सूचना देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सुमारे १० ते ७५ डेसीबलपेक्षा अधिक आवाज असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नवरदेव वैजनाथ पाटील, त्यांचे वडील अशोक पाटील (दोघेही रा. सुंडी), वधुपिता परशराम मारुती बिर्जे (रा. कडलगे खुर्द), साऊंड सिस्टीमचा मालक नंदराज शिवाजी पाटील (रा. हडलगे, ता. गडहिंग्लज), ऑपरेटर ओमकार सुरेश पाटील (रा. महागाव, ता. गडहिंग्लज), सागर पाटील, क्षितीज मुतकेकर, विठ्ठल येरुळकर, नरसू आंबेवाडकर, तानाजी पाटील, अंकुश येरुळकर, आदित्य पाटील, शरद पाटील व एका अनोळखी पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला.