
शिनोळी येथे शिवसेनेचा रास्ता रोको
02798
शिनोळी ः काजू बोर्डाचे कार्यालय शिनोळी येथे व्हावे, या मागणीसाठी शिवसैनिकांनी बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांना निवेदन देण्यात आले.
-----
शिनोळी येथे शिवसेनेचा रास्ता रोको
बेळगाव- वेंगुर्ला मार्ग रोखला; काजू बोर्डाचे मुख्य कार्यालय चंदगडला करण्याची मागणी
चंदगड, ता. २९ ः शासनाच्या काजू महामंडळाचे मुख्य कार्यालय चंदगड येथे करावे, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर शिनोळी (ता. चंदगड) येथे रास्ता रोको करण्यात आला. यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली.
शासनाने काजू महामंडळाची स्थापना करताना सर्वाधिक उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग असलेल्या चंदगड, आजरा तालुक्यांवर अन्याय केल्याची भावना आहे. महामंडळाचे मुख्य कार्यालय वाशी (मुंबई) येथे तर उर्वरीत दोन विभागीय कार्यालये सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथे केली आहेत. घाटमाथ्यावरील चंदगड, आजरा, कर्नाटक सीमाभागातील बेळगाव, खानापूर, कारवार परिसरात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन असताना या विभागाला न्याय दिला नसल्याची भावना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केली. पालकमंत्री दीपक केसरकर चंदगड, आजरा तालुक्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. काजू महामंडळाची स्थापना केली म्हणून फलकबाजी करणारे स्थानिक नेते महामंडळाचे कार्यालय येथे यावे म्हणून प्रयत्न करीत नाहीत, याबद्दल खंत व्यक्त केली.
महामंडळाचे कार्यालय चंदगड येथे न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी दिला. जिल्हा महिला संघटक शांता जाधव यांच्यासह शिवसैनिक, महिला कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.