
टुडे ५ ॲंकर
00260
00259
मसाईपठार ः मोहीम मार्गावर भातशेतीतून वाट काढताना ट्रेकर्स व या परिसरात वाटप केलेले शालेय साहित्य.
डोंगर-दऱ्यांतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवर समाधान
वाड्यावस्त्यांवर पोहोचले शालेय साहित्य; पदभ्रमंती मोहिमेत अनेक संस्थांचे पाठबळ
उत्तम महाडिक ः सकाळ वृत्तसेवा
देवाळे, ता. ३ ः जुलै महिना आला, की शिवप्रेमी, निसर्गप्रेमी यांना वेध लागतात, ते पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे. स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान केलेल्या नरवीर शिवा काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांची निष्ठा, त्याग व स्वामीनिष्ठेने भारावलेल्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देण्याऱ्या या मार्गावरील पदभ्रमंती मोहिमेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, बेळगाव व गोव्यासह देशभरातील विविध राज्यांतून शिवप्रेमी येतात.
सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांच्या, कड्या कपारींच्या या परिसरात दाट धुके, मुसळधार पाऊस असतो. या पावसाची कोणतीही तमा न बाळगता ‘जय भवानी...जय शिवाजी... छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय...हर हर महादेव...’ हा जयघोष करीत शिवप्रेमी शिवरायांच्या इतिहासाची पाने जागृत करीत ही खडतर वाट तुडवतात. १२ जुलै १६६० रोजीच्या रात्री याच दाट धुक्याचा व मुसळधार पावसाचा फायदा घेऊन सह्याद्रीच्या या डोगररांगा, कड्या-कपारींची ढाल करून छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्याने पन्हाळगडाभोवती कडेकोट पहारा असणाऱ्या सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून मोजक्या बांदल मावळ्यांसह विशाळगडावर पोहोचले होते. याचाच प्रत्यक्ष साडेतीनशे वर्षांपूर्वीचा ज्वलंत व थरारक इतिहास हे गिर्यारोहक या पदभ्रमंती मोहिमेतून अनुभवतात.
अगदी आठ वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील युवक, वृद्ध, तसेच महिला उत्साहाने सहभागी होतात.
या मोहीम मार्गावर डोंगरावर, दऱ्याखोऱ्यात अनेक छोटी गावे, वाडया वस्त्या वसल्या आहेत. ज्या आजही दुर्गम आहेत. याच वाड्या वस्त्यांवरील मुलांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून या मोहिमेला जाणारे शिवप्रेमी येथील मुलांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सील, पाऊच, स्कूलबॅगसह विविध शालेपयोगी साहित्याबरोबरच खाऊचे वाटप करून कोणत्याही प्रसिद्धीशिवाय सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करीत आहेत.
कोट
शिवविचारातून प्रेरणा घेऊन पदभ्रमंतीसाठी येणाऱ्या गिर्यारोहकाकडू दिल्या जाणाऱ्या शालेय साहित्यातून या दुर्गम वाड्या-वस्त्यावर शिक्षण घेण्याऱ्या मुलांना नक्की बळ मिळेल.
- जयवंत खेतल, शिक्षक-तुरुकवाडी.
Web Title: Todays Latest Marathi News Dev22b00200 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..