चार गावात चार महिने पाणीटंचाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार गावात चार महिने पाणीटंचाई
चार गावात चार महिने पाणीटंचाई

चार गावात चार महिने पाणीटंचाई

sakal_logo
By

गवशी (ता. राधानगरी) येथे फुटलेल्या बंधाऱ्याची पाहणी करताना आमदार प्रकाश आबिटकर व अधिकारी.
803
....

चार गावांत चार महिने पाणीटंचाई

माती बंधारा फुटलाः तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे

धामोड, ता. ११ : गवशी-पाटीलवाडी (ता. राधानगरी) व बळपवाडी (ता. पन्हाळा) दरम्यान असलेला धामणी नदीवरील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभारलेला मातीचा बंधारा पाण्याच्या दाबामुळे शनिवारी (ता. १०) फुटला. त्यामुळे येथील चार गावांना चार महिने पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. परिणामी येथील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. दरम्यान, आज तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे केले. आज शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाला भेट दिली.
गवशी पाटीलवाडी येथे अडीच लाख रुपये खर्चून स्वखर्चाने बांधलेला मातीचा बंधारा वाहून गेल्याने गवशी, पात्रेवाडी, भित्तमवाडी, बळ पवाडी या गावांना चार महिने पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. येथे शेतीच्या पाण्याचा विषय गंभीर झाला आहे. आज राधानगरी तहसील विभागाकडून ४१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले. तलाठी संदीप हजारे, कृषी सहायक तानाजी परीट यांनी पंचनामे केले. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांनी बंधाऱ्याची पाहणी करताना एक महिन्यात येथे कोल्हापूर पद्धतीच्या नवीन बंधाऱ्याचे भूमिपूजन केले जाईल, असे शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, उपविभागीय अभियंता प्रवीण पारकर, शाखा अभियंता राकेश नाझरे, अजिंक्य पाटील उपस्थित होते.
..........
चौकट
अफवांवर विश्वास ठेवू नये

धामणी नदीवर गवशी-पाटीलवाडी व बळपवाडी दरम्यान असलेला बंधारा पाण्याच्या अति प्रवाहामुळे वाहून गेला आहे. दरवर्षी अशा पद्धतीचे मातीचे बंधारे धामणी नदीमध्ये शेतकऱ्यांच्याकडून घातले जातात, मात्र बंधारे फुटण्याच्या कोणत्याही घटना घडत नाहीत. गेल्या आठवड्यात धामणी नदीवर पाटबंधारे विभागाने उपसाबंदी लागू केली होती. उर्वरित मातीच्या धरणामध्ये पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी अशा पद्धतीची उपसा बंदी लागू केली होती. या बंधाऱ्या‍त प्रमाणापेक्षा जास्त पाणी अडवल्याने ही घटना घडली आहे, मात्र हे पाणी धामणी नदीपात्राच्या बाहेर गेलेले नाही. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी घाबरू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.
....