तुळशी जलाशयाला अतिक्रमणाचा विळखा

तुळशी जलाशयाला अतिक्रमणाचा विळखा

00976

तुळशी पाणलोट क्षेत्रात अतिक्रमणे
सात गावांतील चित्र; नोटिसीपलीकडे प्रशासनाची कारवाई शून्य
धामोड, ता. ७ : राधानगरी तालुक्यातील प्रमुख तीन धरणांपैकी एक असलेल्या तुळशी जलाशयाला अतिक्रमणांचा विळखा बसला आहे. जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात होणारी अतिक्रमणे चिंतेचा विषय बनला असून प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. भविष्यात पाणलोट क्षेत्रात पाणी साठवणुकीचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
तालुक्याच्या पश्चिम परिसरातील साडेतीन टीएमसीचा हा जलाशय छत्तीस गावांसाठी वरदायी ठरला. जलाशयाच्या निर्मितीवेळीच सात गावे विस्थापित झाली. इतरांचे संसार फुलवण्यासाठी धरणग्रस्तांनी स्वतःच्या संसारावर पाणी सोडले. यामुळेच राधानगरी व करवीर तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्रावर हरितक्रांती झाली. मात्र सध्या जलाशय अतिक्रमणांच्या वेढ्यात सापडला आहे.
पावसाअभावी अनेकदा तुळशी जलाशय पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे शेजारच्या केळोशी लघुपाटबंधारे प्रकल्पातून अतिरिक्त पाणी तुळशी जलाशयात सोडण्यात येते. त्यामुळे सहा वर्षांपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सात गावांतील लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. पाणलोट क्षेत्रात उसाचे पीक घेतले जाते. दरवर्षी अशा अतिक्रमणधारकांना पाटबंधारे विभागाकडून केवळ नोटीस देण्याचे काम केले जाते. मात्र पुढील कारवाई केली जात नाही. त्यामुळे नेमकी कारवाई कुठे थांबते, असा प्रश्न जनतेला पडला आहे. जलाशयाच्या काठावर अनेक लोकांनी जमिनी घेतल्या आहेत. अनेकांनी फार्म हाऊस बांधले आहे. पाणलोट क्षेत्रातही अतिक्रमणे झाली आहेत. शासन केवळ अतिक्रमणधारकांना नोटीस देण्याचे काम करते; मात्र पुढील कारवाई करत नसल्याने पाणलोट क्षेत्राचा प्रश्न गंभीर बाब बनली आहे.

कोट :
तुळशी जलाशयामुळे परिसराचा विकास झाला. जलाशयाच्या काठावरील गावांतील शेतकऱ्यांनी पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी अतिक्रमणे केली आहेत. शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
- दशरथ नलवडे; स्थानिक ग्रामस्थ

कोट
दरवर्षी पाणलोट क्षेत्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस पाठवली जाते. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असून आदेश मिळताच कारवाई केली जाईल.
- खंडेराव गाडे, शाखा अभियंता, तुळशी प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com