
धामोड बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी
धामोडला वाहतूक कोंडी नित्याचीच
धामोड : येथील बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी नित्याची बाब बनली आहे. वाहनांची गर्दी, बेशिस्त पार्किंग यामुळे वाहनचालक व प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. धामोड परिसरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. गावाशी दवाखाना, बँका, शिक्षणानिमित्ताने ३५ गावांचा सातत्याने संपर्क येत असतो. परिसरात धामोड मोठी बाजारपेठ असल्याने येथे लोकांची वर्दळ सतत असते. त्यामुळे वाहनधारक बाजारपेठेत बेशिस्तपणे वाहने उभी करतात. यावर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे एसटी चालकही बाजारपेठेत एसटी नेण्यास मनाई करत आहेत. त्यामुळे वृद्ध प्रवासी, महिलांना फटका बसत आहे. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी प्रकाश सुतार यांनी केली आहे.