
''सीएनजी''च्या दरात दिवसेंदिवस वाढच
00639
-----
‘सीएनजी’च्या दरात दिवसेंदिवस वाढच
वाहनचालक त्रस्त; साडेतीन महिन्यात १६.२० रुपये वाढ
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता.२१ ः पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरातून वाचण्यासाठी दीड-दोन वर्षामध्ये ‘सीएनजी’वरील गाड्यांची संख्या वाढली. सध्या केंद्र आणि राज्य सरकारने वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. तुलनेत साएनजीचे दर मात्र चढेच राहिले आहेत. साडेतीन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सीएनजीच्या दरात १६.२० रुपये तर वर्षभरामध्ये २३.९५ रुपयांची वाढ झाली आहे.
दोन एप्रिलला जिल्ह्यात सीएनजी ७६.२५ रुपये प्रतिकिलो होता. आता तो ९२.४५ रुपये प्रतिकिलो आहे. २०२० मध्ये अनलॉक झाल्यानंतर सातत्याने इंधनाचे दर वाढत गेले. पेट्रोलचे वाढत चालले दर पाहता अनेक कार मालकांनी जुन्या पेट्रोलवरील गाड्यांना सीएनजी किट बसवून घेतले. नवीन घेणाऱ्यांनी सीएनजीच्या कंपनी फिटेट गाड्यांना पसंती दिली. पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त व पेट्रोलपेक्षा मायलेज जास्त मिळत असल्यामुळे अधिकचा खर्च करून कारमालकांनी सीएनजी वापर वाढवला.
मात्र आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत असताना सीएनजीच्या दराची गाडी सुसाट सुटली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींना वैतागून हजारो रुपये खर्च करून सीएनजी करूनही महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएनजीवरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केल्याने थोडा दिलासा मिळाला. पण त्यानंतरही दर वाढतच गेले आहेत.
-----------
पेट्रोलचे दर वाढले म्हणून ५२ हजार रुपये खर्च करून सीएनजी किट बसवले. दिवसेंदिवस गॅसच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे हजारो रुपये वाढीव गुंतवणूक करून हवा तसा फायदा सीएनजीमुळे होईना.
-आण्णासो पाटील, दानोळी
Web Title: Todays Latest Marathi News Dnl22b00518 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..