
पोलंड सरकार उभारणार संग्रहालय
26961
वळिवडे ः येथे सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात पोलंडचे सन्माननीय प्रतिनिधी, संभाजीराजे छत्रपती आणि उपस्थित मान्यवर.
पोलंड सरकार वळिवडेत
उभारणार संग्रहालय
प्रवीण जाधव ः सकाळ वृत्तसेवा
गांधीनगर, ता. ५ ः दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या आक्रमणातून बचावलेल्या शरणार्थींना जिल्ह्याने दिलेल्या संरक्षण आणि मदतीच्या स्मरणार्थ त्यांच्या देशाचे सरकार महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील वळिवडेत एक छोटेसे संग्रहालय उभारणार असल्याचे पोलंडचे भारतातील राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन मुंबई येथून राजभवनाने प्रसिद्घीस दिले आहे. तत्कालीन छत्रपती शहाजीराजे यांनी या शरणार्थींना आसरा देण्याचे धाडस आणि औदार्य दाखविले होते.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रोफेसर बुराकोव्स्की यांनी येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि इतर मुद्द्यांसह एक छोटे संग्रहालय बांधण्याबाबत चर्चा केली. दुसऱ्या महायुद्धात पोलंडवर जर्मनीच्या आक्रमणामुळे किमान ५००० पोलिश नागरिकांनी पलायन करून कोल्हापुरात आश्रय घेतला होता. कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती शहाजीराजे यांनी या सर्वांना आश्रय देण्याचे ठरविले. त्यानुसार कोल्हापूरजवळील वळिवडेत या सर्व लोकांना राहण्यासाठी बरॅक, दवाखाना, मनोरंजनासाठी सभागृह, चर्च आदी वास्तू बांधल्या होत्या. दुसरे महायुद्ध होईतोपर्यंत हे पोलंडवासीय येथेच राहत होते. त्यांच्यापैकी काहीजणांचा येथेच मृत्यू झाला. या मृतांना येथेच दफन करण्यात आले. महायुद्ध संपल्यानंतर पोलंडवासीय आपल्या मायदेशी निघून गेले.
काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात केंद्र सरकार, कोल्हापूरचे नागरिक यांनी छळ झालेल्या समाजाला संरक्षण आणि आसरा देणाऱ्या राजघराण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. निवेदनात मात्र प्रस्तावित संग्रहालयाबाबत कोणताही तपशील नमूद केलेला नाही. सध्या सुमारे ४०,००० भारतीय पोलंडमध्ये राहत आहेत आणि विविध क्षेत्रांत योगदान देत आहेत, असे ते म्हणाले. मुंबईतील पोलंडचे महावाणिज्यदूत डॅमियन इरझिक हेही उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01153 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..