
जोश ओसरला; अनुभव बहरला
‘डी’मधून
जोश ओसरला;
अनुभव बहरला
- दीपक कुपन्नावर
क्रीडा विश्वातील सर्वांत महागडा खेळाडू म्हणून नावलौकिक असणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालच्या बेंचवर हे स्वप्नातही न पटणारे दृश्य. इतकेच नाही, चक्क ख्रिस्तियानो मैदानात नसताना पोर्तुगालने तब्बल अर्धा डझन गोलने नवख्या स्वित्झर्लंडचा फडशा पाडला, हा दुसरा धक्का. ही किमया पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सातोंस यांची. दुबळ्या दक्षिण कोरियाकडून हार पत्करल्यावर प्रशिक्षक सातोंस यांनी बाद फेरीसाठी ख्रिस्तियानोला वगळण्याचा निर्णय हे मोठे धाडस होते. त्यांनी विश्वास दाखविलेल्या गोकांला रामोसने थेट हॅटट्रिक करीत आपणच पोर्तुगालचा नवा ख्रिस्तियानो असल्याचे सिद्ध केले. प्रशिक्षक असाच धाडसी असावा लागतो. केवळ डावपेचाचा भाग म्हणूनच ख्रिस्तियानो संघात नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी नंतर दिले. संघाचा प्रमुख म्हणून प्रत्येक गोलच्या जल्लोषात अग्रभागी राहून खेळाडूंना प्रोत्साहन देत ख्रिस्तियानाने आदर्श खेळाडूचा वस्तुपाठच घालून दिल्याचे सांगत प्रशिक्षक सांतोस यांनी कौतुकही केले.
विश्वकरंडक स्पर्धेवर चौफेर कामगिरीद्वारे छाप पाडून काही खेळाडूंनी दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे. यात पेले, रोमारिओ, रोनाल्डो (ब्राझील), दिएगो मारडोना (अर्जेटिना), फ्रांझ बेकेनबाऊर, लोथर माथायस, ऑलिव्हरकान (जर्मनी), झिनेदीन झिदान (फ्रान्स), रॉबर्ट बॅजिओ (इटली) अशी नावे पटकन नजरेसमोर येतात. यंदा फ्रान्सचा किलियन एम्बापे, इंग्लंडचा ज्युदे बर्लिंगहँम, मार्कस रँशफोर्ड, ब्राझीलचा रिचार्लिसन आघाडीवर आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या निर्णायक वळणावर कोण ठसा उमटवणार, याची उत्कंठा वाढली आहे.
फिफा वर्ल्डकप बाद फेरीच्या दुसरा अंकाचा समारोप झाला. लीगमध्ये उलाथापालथ करून अनपेक्षितपणे बाद फेरी गाठलेल्या नवख्या अमेरिका, पोलंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, जपान यांचा जोश ओसरला. केवळ लढवय्या जपाननेच गत उपविजेत्या क्रोएशियाला टायब्रेकरपर्यंत झुंजविले. परिणामी, माजी विजेते ब्राझील, अर्जेंटिना, फ्रान्स, इंग्लंड, उपविजेता क्रोएशिया, नेदरलॅंड आणि पोर्तुगाल या प्रस्थापितांमध्येच उपांत्यपूर्व फेरीत झुंज होणार आहे. आफ्रिका खंडातील नवोदित मोरोक्को या एकमेव संघाने आव्हान टिकविले. साखळीत माजी विजेता जर्मनी, तर बाद फेरीत स्पेन सुमार कामगिरीमुळे स्पर्धेबाहेर फेकले गेले. त्यामुळे बाद फेरीत नवख्यांचा जोश ओसरला; तर प्रस्थापितांचा अनुभव बहरला, असेच म्हणावे लागेल.