मिरचीची आवक वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरचीची आवक वाढली
मिरचीची आवक वाढली

मिरचीची आवक वाढली

sakal_logo
By

82278
गडहिंग्लज : बाजार समितीच्या आवारात मिरचीची आवक वाढली आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)


मिरचीची आवक वाढली
लिंबूचा दर वधारला; द्राक्षे स्थिर, मागणीमुळे बकऱ्याचे दर तेजीत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या मिरचीच्या किरकोळ बाजारात आवक वाढू लागली आहे. जवारी मिरचीचा दर अधिक आहे. भाजी मंडईत पालेभाज्या, फळभाज्या यांची चांगली आवक आहे. मागणी वाढल्याने लिंबूचे दर वधारले आहेत. फळबाजारात द्राक्षे, डाळिंब, माल्टा, पेरू, चिकू यांची आवक टिकून आहे. जनावरांच्या बाजारात बकऱ्याचे दर तेजीत आहेत.
नोव्हेंबरपासून मिरचीचा हंगाम सुरू होतो. येथील बाजार समिती मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. दर रविवारी मिरचीचा किरकोळ आठवडा बाजार भरतो. उन्हाळ्यात घरगुती वापरासाठी मिरचीची खरेदी केली जाते. त्यामुळेच या बाजारात आवक वाढू लागली आहे. ग्रामीणसह लगतच्या सीमाभागातून सुमारे शंभरहून अधिक विक्रेते आले होते. जवारी ८०० ते १२००, गुंटूर २००-२५०, पायशी ३५०-४५०, ब्याडगी ३५० ते ५००, काश्मिरी ४००-५५० रुपये किलो असा दर आहे.
भाजीमंडईत गेले तीन महिने वाढलेल्या वांग्याचे दर कमी झाले आहेत. लावणीतील वांगी विक्रीस आल्याने हा परिणाम झाल्याचे भाजीपाला खरेदी विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. मेथी, कोंथिबिर यांचीही आवक जास्त असल्याने दर कमी आहेत. शेकडा पेंडी ३०० ते ४०० तर किरकोळ बाजारात पाच रुपये पेंडी असा दर होता. टोमॅटोच्या दरात किंचित वाढ झाली आहे. दहा किलोचे दर असे, कोबी १००-१५०, मिरची ३००-५००, ढब्बू ५००, दोडका ३५०, वांगी १५०, टोमॅटो १२०, कारली ३०० रुपये.
उन्हाळ्यामुळे मागणी वाढल्याने लिंबूचे दर वाढले आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दर वाढल्याने नजीकच्या काळात लिंबू सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे जाण्याची शक्यता आहे. नगाला दोन ते तीन रुपये असा दर आहे. द्राक्षे ४० ते ६०, पेरू, डाळिंब, माल्टा ७० ते ८० रुपये किलो आहेत. सफरचंद १२० ते १५० रुपये किलो आहेत. परिसरात यात्रा सुरू झाल्याने बकऱ्यांचे दर तेजीत आहेत. बाजार समितीत १०० हून शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली. ५ ते १५ हजारांपर्यंत दर होते. म्हशींची १२० हून अधिक आवक होऊन २५ ते ८० हजारांपर्यंत दर होते.
------------------
चौकट
चिकन, अंडी दर उतरला
गेले दोन महिने तेजीत असणाऱ्या चिकन आणि अंड्याचे दर मागणीअभावी उतरले आहेत. उन्हाळ्यामुळे ही मागणी कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चिकनचा किलोचा दर १४० ते २०० रुपये, तर अंडी नगाला पाच रुपये असा दर झाला आहे. किलोमागे सरासरी २० ते ४० तर अंडी नगाला दोन रुपयांनी भाव उतरला आहे.