सामानगड ‘महादरवाजा’ सर्वंधनासाठी एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामानगड ‘महादरवाजा’ सर्वंधनासाठी एल्गार
सामानगड ‘महादरवाजा’ सर्वंधनासाठी एल्गार

सामानगड ‘महादरवाजा’ सर्वंधनासाठी एल्गार

sakal_logo
By

gad286.jpg
85834
गडहिंग्लज : दुर्गवीर प्रतिष्ठातर्फे सामानगड महादरवाजाच्या पायऱ्या खोदकामातून साफ केल्या जात आहेत.
------------------------------

सामानगड ‘महादरवाजा’ सर्वंधनासाठी एल्गार
दुर्गवीर प्रतिष्ठान; दोन महिन्यांपासून मावळ्यांची पराकाष्टा, चौथऱ्याची सफाई
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : ऐतिहासिक सामानगडाच्या गत वैभवासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानने विडा उचलला आहे. दोन महिन्यांपासून पूर्वाभिमुख ‘महादरवाजा’च्या संर्वधनासाठी दुर्गवीरच्या मावळ्यांनी एल्गार पुकारला आहे. मातीच्या ढिगाखाली दबलेल्या या प्रवेशद्वाराला मोकळे करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. दरवाजाचा कोसळलेला भाग पुन्हा श्रमदानातून उभारण्यात येत आहे.
बाराव्या शतकात राजा भोज यांनी बांधलेला हा किल्ला गडहिंग्लज परिसराचा ऐतिहासिक ठेवा आहे. छत्रपती शिवाजी महारांजानी या किल्ल्याची डागडुजी करून लढाईचे साहित्य ठेवण्यासाठी वापर केला. साहजिकच किल्याचे सामानगड असे नामकरण झाले. येथून सात कि.मी.वरील हा किल्ला केवळ देखभालीअभावी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर होता. अशावेळी दुर्गवीर प्रतिष्ठानने या किल्ल्याच्या अस्तित्वासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या. दर रविवारी श्रमदान करत दुर्गवीरचे पंचवीसहून अधिक मावळे उत्खनन, बांधणी, स्वच्छता यात दंग असतात. त्यातूनच सर्व ऐतिहासिक स्थळांचे माहितीपूर्ण फलक, सात कमान विहिरीचा गाळ काढणे, सोंडी बुरूजाची स्वच्छता झाली.
नौकुडकडील दिशेला लाल पाषाणातील हा महादरवाजा आहे. या दरवाजाच्या पायऱ्या मातीच्या ढिगाखाली दबल्या आहेत. दुर्गवीरचे मावळे खोदकामातून त्या मोकळ्या करत आहेत. सुमारे सत्तरहून अधिक पायऱ्या खुल्या केल्या आहेत. दरवाजाच्या डाव्या बाजूचा चौथरा कोसळला होता. तो नैसर्गिकरीत्या उभारला आहे. महादरवाज्याची साफसफाई सुरू आहे. खूप वर्षांपासून दबल्यामुळे अनेक ठिकाणी पायऱ्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांची दुरुस्तीसाठी मावळे घाम गाळत आहेत. गडाच्या बुरूजावर वाढलेली झाडे - झुडपेही काढून टाकली जात आहेत. महादरवाजा मोकळा झाल्यावर सामानगडाला नवे स्वरुप येणार आहे.
--------------------
नव्या दमाचे मावळे
सामानगड सर्वंधनाचे काम सात वर्षांपासून सुरू आहे. गडहिंग्लजसह गडाच्या लगतच्या नूल, बसर्गे, येणेचवंडी, नौकुड, चिंचेवाडी येथील मावळे निरपेक्षपणे कार्यरत आहेत. यात आता नव्याने सावतवाडी, बटकणगंले येथील नव्या दमाच्या मावळ्यांची भर पडली आहे. परिणामी, सर्वंधनाला गती आली आहे.