
संघर्ष फायटर्सची विजयी सलामी
gad183.jpg
03545
गडहिंग्लज : डेव्हलपमेंन्ट लिग स्पर्धेत दादा जीएमजीएमच्या सौरभ मोहितेने गुफा गार्डीयन खेळाडूंना चकवून मुसंडी मारली. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------
संघर्ष फायटर्सची विजयी सलामी
शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीग; दादा जीएम – गुफा गार्डियन्स बरोबरीत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात संघर्ष फायटर्सने फिजिक जिम वॉरियर्सला ३-२ असे नमवुन विजयी सलामी दिली. दादा जीएम चँलेजर्स विरुध्द गुफा गार्डीयन्स हा दुसरा सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला. संघर्षच्या श्रवण पाटीलचे दोन गोल दिवसाचे वैशिष्ट ठरले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुल यांच्यामार्फत एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर डेव्हलपमेंट लिगला दिमाखात प्रारंभ झाला.
सायंकाळी पाच वाजता शिवराजचे प्राचार्य डॉ एस. एम. कदम यांच्याहस्ते स्पर्धेला प्रारंभ झाला. संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष गुंडू पाटील, आमीर नदाफ, अभिजीत देवार्डे, शेखर कदम, आदित्य देवार्डे आदी उपस्थित होते. महेश सुतार यांनी स्वागत केले. यासीन नदाफ यांनी आभार मानले. हुलाप्पा सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. दादा जीएम चँलेंजर्सने गुफा गार्डियन्स गोल शून्य बरोबरीत रोखले. दादा जीएम चँलेजर्सच्या शुभम आजगेकरने हेडिंगची सोपी संधी दवडली. गुफाचा कर्णधार सुरज हनिमनाळेचा फटका गोलखांबावरून गेला. दादा संघाच्या अब्दुल कोचरगीची फ्रीकीक संघाला विजयापर्यंत पोहचवू शकली नाही.
अटीतटीच्या सामन्यात संघर्षने कर्णधार श्रवण पाटीलच्या दोन गोलच्या जोरावर फिजिक जिमवर ३-२ असा रोमांचक विजय नोंदवला. नील थोरातने गोल करून फिजिक जिमचे खाते उघडले. पाठोपाठ संघर्षच्या आयर्न दळवीने गोल करून बरोबरी साधली. संघर्षच्या श्रवणने मैदानी गोल करून आघाडी २-१ अशी केली. फिजिकच्या सिध्दार्थ दड्डीकरने गोल करून २-२ अशी बरोबरी साधली. शेवटच्या ठप्प्यात पेनल्टीवर श्रवण पाटीलच्या गोलमुळे सहकाऱ्यांना जल्लोष केला. दरम्यान, स्पर्धेच्या आदल्या दिवशी सायंकाळी खेळाडूंची शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली झाली. ‘मैदानी खेळ.. आरोग्याचा मंत्र’, ‘मोबाईल टाळा.. मैदानावर चला’, ‘फुटबॉल खेळू या.. आरोग्य जपूया’, ‘सदृढ शरीर.. सदृढ मन’ असे फलक घेऊन खेळाडू सहभागी होते.
--------------------
आजचे सामने
१) युनायटेड रायझिंग स्टार्स वि. फिजिक जिम वॉरियर्स सायंकाळी ४ वाजता.
२) दादा जीएम चँलेंजर्स वि. इफा लायन्स सायंकाळी. ५ वाजता.
-------------------------------
दीपक कुपन्नावर, गडहिंग्लज.