वाठार चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाठार चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच
वाठार चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच

वाठार चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच

sakal_logo
By

08026
वाठार : अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच आहे.
-----
वाठार चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच
रस्त्यावर अतिक्रमण; वाईटपणा नको या भावनेतून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
संजय पाटील ः सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. ८ : हातकणंगले तालुक्यातील पुणे-बंगळूर महामार्गावरील प्रसिद्ध असलेल्या वाठार चौकासह सर्वच रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कशाला वाईटपणा या भावनेतून शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. मोठा अपघात झाल्यानंतरच अतिक्रमणाचे गांभीर्य कळणार काय, असे अनेक प्रश्न नागरिकांना सतावत आहेत.
वाठार चौकातून मिरज ते रत्नागिरी व पुणे-बंगळूर महामार्ग जातो. त्यामुळे वाहनांसह प्रवाशांची रात्रंदिवस गर्दी असते. याचाच फायदा घेऊन अतिक्रमणे झाली आहेत. वाठार-वारणानगर रस्त्यावरून वाहनांची गर्दी असते. गॅसची वाहतूक करणारे टॅंकर, स्कूल बसेस, तसेच वडगाव-वाठार-कोडोली बसेससह रत्नागिरीकडे अवजड वाहने कसरत करीत जातात. कधी कधी अपघात होतात. यावेळी अतिक्रमण करणारेच वाहनचालकांना फटके लावायला मागेपुढे पाहत नाहीत. नजीकच्या बसस्थानकाभोवती अतिक्रमणे असल्याने बसेस आत येताना अतिक्रमणातून सावरत येतात. व्यापाऱ्यांसह नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत. अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमणे काढली; पण काही दिवसांनंतर पुन्हा अतिक्रमणे अशी शृंखला सुरू आहे.
पूर्वीचा पुणे-बंगळूर महामार्ग सध्याच्या बसस्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूने आहे. हा रस्ता ७० फुटी होता. जुना मार्ग म्हणून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आणि तो अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. त्यामुळे जणू बोळ असल्याचे चित्र आहे.
यापूर्वी नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या; पण अतिक्रमणांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे शक्य झालेले नाही. आपणच का वाईटपणा घ्यायचा, यासाठी अतिक्रमणधारकांना खतपाणी घातले जात आहे. अतिक्रमणे न काढताच पिण्याच्या पाण्याची योजना, गटर्स योजना राबवल्या जात आहेत.
रस्ते, मोकळ्या सरकारी जागांवर स्वतःचीच जागा समजून अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणे हटवण्याची भूमिका कोणाची दिसत नाही. तक्रार झाल्यास सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ग्रामपंचायत प्रशासन एकमेकांवर याबाबत ढकलून मोकळे होतात‌. अतिक्रमणामुळे वाठार गावात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग, रस्ते विकास विभाग आणि हातकणंगले तहसीलदारांनी याविरोधात तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे.
------
असा प्रश्न सोडविता येईल
अतिक्रमणांविरोधात शासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. पोलिसांनी सातत्याने लक्ष ठेवल्यास अतिक्रमणाचा प्रश्न सोडवता येईल.
------
अतिक्रमणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागांना लेखी कळवले आहे. गावात रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे विकासकामांना खीळ बसत आहे.
-तेजस्विनी वाठारकर, सरपंच, ग्रामपंचायत वाठार.