गारगोटी : बीटीएस परीक्षेत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : बीटीएस परीक्षेत बदल
गारगोटी : बीटीएस परीक्षेत बदल

गारगोटी : बीटीएस परीक्षेत बदल

sakal_logo
By

भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षा स्वरूपात बदल
गुणांऐवजी श्रेणीचा वापर; सर्वच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचा विचार

गारगोटी, ता. १९ : भुदरगडचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी संपतराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून २०११ पासून इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या भुदरगड प्रज्ञाशोध (बीटीएस) परीक्षेला दशक पूर्ण झाले. या परीक्षेची उपयुक्तता व महत्व वाढल्याने गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी परीक्षा मूल्यमापन प्रक्रिया स्वरूप बदलले आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार इयत्ता तिसरीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मूलभूत वाचन, लेखन व अंकगणितीय क्षमता प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांमधील गुणांची स्पर्धा संपावी, मुलांनी फ्ल्युअन्सी इन लँगवेज अँन्ड न्युमरसी (FLN) व निपुण भारतची उद्दिष्टे प्राप्त करावीत यासाठी परीक्षेची मूल्यमापन प्रक्रिया बदलली आहे. ज्यामध्ये मुलांना गुणांऐवजी चालू वर्षापासून श्रेणी देण्यात येईल. याशिवाय सर्व मुलांच्या गुणांच्या बेरजेला पटसंख्येने भागून सरासरी गुण ठरविण्यात येतील. वर्गातील अधिक पटसंख्येनुसार बोनस गुण देऊन समतोल साधण्यात येईल. यात वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला महत्व दिल्याने सर्वच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. वर्गाच्या सरासरी गुणांच्या आधारे संबंधित वर्गाची रँक ठरणार असून, आपल्या वर्गाची व शाळेची रँक उत्कृष्ट ठरण्यासाठी वर्गशिक्षकांना सर्वच विद्यार्थ्याची चांगली तयारी करून घ्यावी लागणार आहे. शक्यतो शिष्यवृती किंवा प्रज्ञाशोध परीक्षांसाठी काही ठराविकच विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याकडे असणारा कल या नव्या मूल्यमापन पद्धतीमुळे बदलावा लागणार आहे. परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांना शिक्षण विभागातर्फे गौरविण्यात येणार आहे.

कोट
दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या भुदरगड प्रज्ञा शोध परीक्षेत वेळोवेळी अभ्यासक्रमातील बदलानुसार, क्षमतांचा विचार करून बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना घोकंपट्टीपासून मुक्त करण्यासाठी ज्ञानरचनावादावर आधारित काही प्रश्न अंतर्भूत केले. वर्गातील सर्वच मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी हा बदल केला आहे.
- दीपक मेंगाणे
गटशिक्षणाधिकारी, भुदरगड.


बदललेल्यापद्धतीने घेतलेल्या परीक्षेचा निकाल

इयत्ता- पहिली
प्रथम : विद्यामंदिर, तांबाळे - ९७.३३
द्वितीय : विद्यामंदिर, सोनाळी- ९५
तृतीय : विद्यामंदिर, शाहूनगर- ९४

इयत्ता- दुसरी
प्रथम : विद्यामंदिर, महालवाडी- ९६.८१
द्वितीय : विद्यामंदिर, बशाचामोळा- ९६
तृतीय : विद्यामंदिर, तिरवडे- ९४.०९