
गारगोटी : आमदार आबिटकर परतले
...अखेर आमदार आबिटकर परतले
कार्यकर्त्यांची गर्दी; सत्तासंघर्षातील घडामोडींचा उलगडला सारीपाट
गारगोटी, ता. ८ : आमदार प्रकाश आबिटकर राज्यातील सत्तानाट्याच्या बदलानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर गुरुवारी रात्री येथील घरी परतले. कुटुंबीयांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आनंद व्यक्त केला. आज सकाळपासून आमदार आबिटकर यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दिवसभर त्यांनी कार्यालयात सर्वांशी संवाद साधला.
कार्यकर्त्यांना भेटताना पंधरा दिवसांतील सत्तासंघर्षातील नाट्यमय घडामोडींचा सारीपाट मांडला. कार्यकर्त्यांनी आबिटकरांनी मतदारसंघाच्या हिताची भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सलग दोनवेळा आमदार आबिटकर निवडून आले आहेत. सध्या शिवसेनेचे जिल्ह्यातील ते एकमेव आमदार होते. आघाडी सरकारमध्ये आमदार आबिटकरांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी आबिटकरांना डावलल्याने कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा पडली होती. आता पुन्हा संधी निर्माण झाली असून आमदार आबिटकरांचा समावेश मंत्रिमंडळात करावा, अशा भावना कार्यकर्ते व्यक्त करीत होते. दिवसभरात पावसाची रिपरिप सुरू असूनही कार्यकर्ते भेटण्यासाठी येत होते. जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यावेळी उपस्थित होते.
मंत्रिपदाबाबत
‘वेट अँड वॉच’
मला मंत्रिपद मिळावे अशी इच्छा आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. कारण मतदारसंघाच्या विकासासाठी अजून खूप काम बाकी आहे. यापुढे मतदारसंघात जास्तीत जास्त विकास निधी खेचून आणून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत मंत्रिपदाबाबत ‘पाहूया काय होतेय’ असे आमदार आबिटकर यांनी सांगितले.
मारामारीचा स्पष्ट इन्कार
गुवाहाटीत माझा कोणाबरोबरही वाद झाला नाही. त्यामुळे मारामारीचा प्रश्नच नाही. माझी विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणून मी वेळीच एक व्हिडिओ प्रसारमाध्यमांना पाठविला होता, असे आमदार आबिटकर यांनी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नावेळी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03903 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..