
गारगोटी : आवश्यक पाटील मानधनाविना
पोलिस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेत
गारगोटी, ता. १८ : भुदरगड तालुक्यातील पोलिस पाटील चार महिने मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. ते सध्या विनामानधन काम करीत आहेत. शासनाकडून नुकतेच त्यांचे मानधन जमा झाल्याचे सांगण्यात येते; मात्र येथील पोलिस निरीक्षक रजेवर असल्याने त्यांना ते अद्याप मिळालेले नाही. भुदरगड तालुक्यात तब्बल शंभर पोलिस पाटील आहेत. पोलिस आणि जनतेतील दुवा म्हणून ते मानधन तत्वावर काम करीत आहेत. त्यांना चार महिने मानधन न मिळाल्याने गणेश चतुर्थी, दसरा सण उसनवारीवर साजरे करावे लागले. आता ते दिवाळीपूर्वी तरी मानधन मिळणार काय, या प्रतीक्षेत आहेत. याबाबत पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता पोलिस निरीक्षक संजय मोरे वैद्यकीय रजेवर आहेत. ते रूजू झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल, असे सांगण्यात आले.
..........
भारतीय जनआंदोलनचा मोर्चा
जयसिंगपूर, ता. १८ : भटक्या विमुक्त मागासवर्गीय समाजाची बदनामी करण्याचे काम समाजकंटक करीत आहेत. या समाजकंटकांमुळे भटक्या विमुक्त व मागासवर्गीय गोसावी, डवरी, शिकलगार, मांग गारूडी या जातीतील महिलांचे जगणे अवघड झाले आहे. प्रत्येक गावामध्ये कागद, पत्रा गोळा करणाऱ्या महिलांची अडवणूक केली जात आहे. महिलांचे फोटो काढणे, महिलांची चौकशी करणे, विनाकारण बसवून घेणे, मानसिक त्रास देणे असा प्रकार सुरू असून यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनआंदोलनच्यावतीने जयसिंगपूर पोलिस ठाण्यावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के म्हणाले की, असे प्रकार होत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. शिवाय संबंधित गावच्या पोलिस पाटील यांना माहिती द्यावी. यावेळी दिगंबर सकट, हरिश सकट, रवि वासुदेव, राणी कांबळे, जोताबाई पाटील, अफरिन तहसीलदार, सुनीता चिकदोळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
.............
जयसिंगपुरात गटाराचे सांडपाणी घरात
जयसिंगपूर, ता. १८ : येथील अवचितनगरमधील गटाराचे सांडपाणी विजय पाटील यांच्या घरात आल्याने पालिकेच्या बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या ठिकाणी मोठ्या गटाराची गरज असल्याची मागणी येथील नागरिकांनी करूनही पालिकेकडून अरूंद प्रकारचे गटार बसविण्यात येत आहे; मात्र या गटाराचे सांडपाणी थेट पाटील यांच्या घरात घुसल्याने राहायचे कुठे, असा प्रश्न या कुटुंबाला पडला आहे. पालिकेने तत्काळ येथील गटाराचा प्रश्न सोडवावा अन्यथा आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
...........
........