
गारगोटी : येथे कडकडीत बंद
गारगोटी : बंदमुळे मुख्य चौकात असलेली शांतता.
GRG22B02609,
....
गारगोटीत कडकडीत बंद
राज्यपालांचा निषेध : मोर्चा काढून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
गारगोटी, ता. १९ : छत्रपती शिवराय यांच्याबद्दल सतत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून त्वरित हटवा, या मागणीसाठी येथे सर्वपक्षीय आंदोलन झाले. याप्रकरणी शहरात कडकडीत बंद पाळला. आंदोलनकर्त्यांनी निषेध फेरी काढून राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. सर्व व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेऊन पाठिंबा दर्शविला. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उलाढाल ठप्प झाली.
जोतिर्लिंग मंदिरापासून निषेध फेरीला सुरुवात झाली. क्रांती ज्योतीसमोर निषेध सभा झाली. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, कॉ. सम्राट मोरे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे, डॉ. राजीव चव्हाण यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. यानंतर प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तालुका संघाचे अध्यक्ष बाळ देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद मोरे, राहुल कांबळे, मानसिंग देसाई यांच्यासह पदाधिकारी, युवक उपस्थित होते.
........