गारगोटी : खो-खो स्पर्धा लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : खो-खो स्पर्धा लेख
गारगोटी : खो-खो स्पर्धा लेख

गारगोटी : खो-खो स्पर्धा लेख

sakal_logo
By

चपळाईचा खेळ - खो खो

भारतात विविध पारंपरिक खेळ खेळले जातात. त्यांची सुरुवातही वेगवेगळ्या कारणाने झालेली आपण पाहतो. युद्धात वापरल्या जाणाऱ्या विविध कौशल्यावर आधारित खो-खो या खेळाची निर्मिती झाली असावी. पूर्वी कबड्डीबरोबर खो-खो लाही राजाश्रय मिळाला. कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच मध्यप्रदेशमध्ये (होळकरराजे) या संस्थानच्या नावावर खो-खो संघ आजही राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतात. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने १९३६ मध्ये बर्लिन येथे खो-खोचा प्रेक्षणीय सामना खेळाला गेला. त्याचे कौतुक खुद्द हिटलरने केल्याचा उल्लेख आहे. आत्ता जी ऑलिंपिक स्पर्धा होते, तसे पूर्वी देशी मैदानी खेळाच्या स्पर्धा संस्थानामार्फत घेतल्या जात होत्या.
- संकलनः सौ. कविता चौगले
अध्यापिका, विद्यामंदिर, सोनाळी

खेळामुळे शारीरिक व्यायामबरोबर मानसिक व्यायामही होतो. खो-खो हा मैदानी खेळ अत्यंत सोपा, लोकप्रिय, अल्पखर्चित (साहित्य - दोन खांब) असल्याने याचे महत्व जनसामान्यात राहिलेले आहे. या खेळात वेगाबरोबर ताकद,जोश, उत्साह आणि बुद्धिमत्तेचे महत्त्व आहे. हा खेळ म्हणजे शिकार साधणारा खेळ होय. खो - खो फेडरेशन ऑफ ऑल इंडिया या पहिल्या राष्ट्रीय संघटनेची बांधणी १९५६ मध्ये कै. भाई नेरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.
या खेळात चपळतेने पळायचे असते. कारण प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवा देऊन त्याला बाद करणे किंवा त्याच्यापासून स्वतःचे संरक्षण करायचे असते. हा खेळ दोन संघात खेळला जातो. प्रत्येक संघात खेळणारे ९ आणि राखीव ३ असे एकूण १२ खेळाडू असतात. एका संघातील ९ खेळाडू पैकी ८ खेळाडू एक - आड एक एकमेकांच्या विरुद्ध तोंड करून बसतात. ९ वा खेळाडू खांबाजवळ उभा राहतो. दुसऱ्या खेळणाऱ्या संघातील ३ खेळाडूच सुरुवातीला पटांगणावर उतरतात. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला आपल्याला स्पर्श करू न देणे असा प्रयत्न असतो. पहिले ३ खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे ३ खेळाडू नंतर ३ खेळाडू येत असतात. प्रत्येक संघ दोन डाव बसतो आणि दोन डाव धावतो. बसणारा (आक्रमक) तर धावणारा (संरक्षक) म्हणतात. आक्रमकाने संरक्षकास स्पर्श केल्यास तो बाद होतो, व आक्रमक संघाला एक गुण मिळतो. असा रोमवर्षक खेळ विशिष्ट वेळेत दोन राउंड मध्ये पूर्ण होतो.

खेळाचे नियम -
* नाणेफेक जिंकणारा संघनायक आक्रमण अगर संरक्षणाची निवड करतो.
* ८ आक्रमक एकमेकांविरुद्ध तोंड करून पट्ट्यावर बसतील व १ खांबापासून धावण्यास सुरुवात करेल.
* संरक्षणाची तीन-तीन विद्यार्थी तुकडी पटांगणावर प्रवेश करेल.
* खो दिल्याशिवाय आक्रमकाने जागा सोडण्याची नाही किंवा दिशा बदलायची नाही.
* आक्रमकाने खो देताना बसलेल्या गड्याला पाठीमागे खांदा व कमरेच्या मधील भागास स्पर्श करून पंचाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात खो द्यावा लागतो.
* आक्रमकाने खो दिल्यानंतर ताबडतोब पट्टीतील चौकामध्ये बसावे.
* धावणारा (संरक्षण) खेळाडूचा पाय सीमारेषेबाहेर गेल्यास व आतील पाय उचलल्यास बाद होतो.
* कोणताही खेळाडू खो दिल्याशिवाय उठून पळू शकत नाही.
* आक्रमकाने मध्यरेषा ओलांडण्यास फाऊल होतो.
* दोन्ही संघांचे समान गुण झाल्यास अतिरिक्त सामना होतो.
* एकाद्यास दुखापत झाल्यास राखीव खेळाडू खेळतो.

* खेळाचे फायदे -
* खो-खो मुळे कार्यक्षमतावाढ व रोगप्रतिकारशक्ती वाढते.
* शिस्त, आज्ञाधारकता व खिलाडूवृत्ती वाढते.
* बौद्धिक क्षमता वाढते, सामाजिक मानसिक विकास होतो.
* सांघीक भावना, नेतृत्व कौशल्य विकसित होते.
* शरीरयष्टी ठणठणीत, राहते.
* नैराश्य, चिंता, तणाव दूर करण्यास मदत होते.

काही प्रमुख स्पर्धा -
* स्कूल चॅम्पियनशिप
* राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप.
* नेहरू गोल्ड कप फेडरेशन कप.
* राष्ट्रीय महिला चॅम्पियनशिप.
* नॅशनल चॅम्पियनशिप.
* सबज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप.
* ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप.

* राष्ट्रीय पुरस्कार*
* द्रोणाचार्य पुरस्कार - क्रीडा प्रशिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल.
* अर्जुन पुरस्कार - क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल.

* राज्यस्तरीय पुरस्कार *
* शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार - खेळाडू
* शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार - संघटक
* उत्कृष्ट राज्य क्रीडा मार्गदर्शक - दादोजी कोंडदेव पुरस्कार.
* शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार.

* राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू *
* पुरुष - एकलव्य
* महिला - राणी लक्ष्मीबाई
* कुमार - वीर अभिमन्यू
* मुली - जानकी
* किशोर - भरत
* किशोरी - इला

* राज्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू *
* पुरुष - राजे संभाजी
* महिला - राणी अहिल्यादेवी
* कुमार - विवेकानंद
* मुली - सावित्री