
गारगोटी : आवश्यक आज भूमिपूजन
भुदरगड पोलिस ठाणे इमारतीचे आज भूमिपूजन
गारगोटी : येथील भुदरगड पोलिस ठाण्याच्या इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ शनिवारी (ता. ४) सकाळी दहा वाजता पोलिस ग्राउंड येथे होत आहे. याकामी ५ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा पोलिसप्रमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. येथील भुदरगड पोलिस ठाण्याची इमारत ब्रिटिशकालीन कालावधीतील आहे. या इमारतीत पोलिसांना दैनंदिन कामकाज करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे येथे अद्ययावत आणि सुसज्ज इमारतींची सतत मागणी होत होती. भुदरगड पोलिस ठाण्याची हद्द मोठी असून, पोलिस ठाण्यात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, येथे अपुऱ्या जागेमुळे पोलिसांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच अनेक सेवासुविधा उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. ही गैरसोय लक्षात घेत प्रशस्त इमारतीची मागणी होत होती.