
गारगोटी : आवश्यक पोलिस ठाणे कार्यक्रम
02833
भुदरगडला पोलिस ठाण्याची
हायटेक इमारत होणार
शैलेश बलकवडे ; गारगोटीत पोलिस ठाणे इमारतीचे भूमिपूजन
गारगोटी, ता. ४ : पोलिसांनी जनतेचा विश्वास सार्थ ठरेल असे काम करावे. भुदरगड पोलीस ठाण्याच्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीची उभारणी झाल्यानंतर पोलिस व जनतेची गैरसोय दूर होईल. येथील इमारत जिल्ह्यात हायटेक ठरेल, असा विश्वास जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला.
येथील भुदरगड पोलिस ठाण्याच्या इमारत भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर अध्यक्षस्थानी होते. इमारत बांधकामासाठी ५ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले प्रमुख उपस्थित होते.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘राधानगरी, आजरा पोलीस ठाण्याच्या अद्यावत इमारती झाल्या. आता भुदरगड पोलीस ठाण्याची सुज्ज इमारत होईल. या कामाचे भाग्य मला लाभले. २६ जानेवारीपर्यंत इमारतीचे काम पूर्ण करावे. तर गारगोटीत प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रश्न मार्गस्थ लागला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येईल.’ पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी प्रास्ताविक केले. गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले, बाजीराव चव्हाण, संदिप वरंडेकर, अंकुश चव्हाण, अशोकराव भांदिगरे, बी. डी. भोपळे, शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत आदींसह पोलीस पाटील उपस्थित होते.
--------
आदमापूरला पोलिस मदत केंद्र
आमदार आबिटकर यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांकडे आवश्यक मागण्या केल्या. यानंतर आदमापूर येथे यात्रेनिमित्त होणारी गर्दी, मुदाळतिट्टा व बिद्री येथील वाहतूकीची कोंडी विचारात घेता आदमापूर येथे कायमस्वरूपी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येईल. भुदरगडला दहा पोलिस कर्मचारी देईन. तसेच पोलीस कर्मचारी निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावीन, अशी ग्वाही जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिली.