
गारगोटी : पालखी सोहळा सांगता
02230
...
भंडाऱ्याच्या उधळणीत रंगला पालखी सोहळा
आदमापूर येथील बाळूमामांच्या भंडारा यात्रेची सांगता
गारगोटी, ता. २० : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत बाळूमामांच्या भंडारा यात्रेची उत्साहात सांगता झाली. विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात आणि भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत पालखी सोहळा रंगून गेला. तर पाच क्विंटल भंडाऱ्याच्या उधळणीने भाविकांसह पालखी मार्गावरील परिसर पिवळाधमक झाला.
भंडारा यात्रेनिमित्त सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सोमवारी सकाळी आठ वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. धनगरी ढोलाच्या गगनभेदी निनादाबरोबरच हरिभजन, लेझीम पथके, दांडपट्टा, बाळूमामांच्या अश्वांचा ढोल-कैताळांच्या तालावरचा नयनरम्य नाच, भजन, संकीर्तन, पालखी पूजन, आरती, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ''बाळूमामांच्या नावानं चांगभलं'' च्या जयघोषात भंडाऱ्याच्या मुक्त उधळण केली. दुपारी दोन वाजता ग्रामदैवत हनुमान देवालयाच्या पटांगणावर पालखी सोहळा आला. येथे भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करीत आनंद लुटला. तर संत बाळूमामांच्या बग्ग्यातील बादल, राजा, सोन्या, पांडुरंग, खिल्लार, सुरयी अशा अकरा अश्वांचे वाद्यावरील नृत्य खास आकर्षण ठरले.
पालखी सोहळ्यानिमित्त गावातील विविध तरुण मंडळांनी मोफत अन्नछत्र उभारले होते. तसेच ताक-सरबताचे वाटप केले. सायंकाळी साडे पाच वाजता गावच्या आड-विहिरीत भंडारा टाकून पालखी सोहळा मंदिराकडे रवाना झाला. यानंतर महाप्रसाद वाटप कार्यक्रम झाला. देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, सरपंच विजय गुरव, उपसरपंच राजनंदिनी भोसले, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे यांच्यासह गावातील पदाधिकाऱ्यांनी सोहळा यशस्वितेसाठी पुढाकार घेतला.