
गारगोटी : मराठी विषय कार्यशाळा
02960
गारगोटी : मराठी विषय कार्यशाळेत बोलताना एम. एन. शिवणगेकर. शेजारी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, बी. एन. पाटील, संजय साबळे
मराठी भाषा वाचविण्याची जबाबदारी शिक्षकांची
एम. एन. शिवनगेकर; गारगोटीत मराठी विषय कार्यशाळा
गारगोटी, ता. २७ : मराठी ही आत्म्याशी संवाद साधणारी भाषा आहे. मात्र सोशल मिडीयामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि लेखनाची आवड कमी होत चालली आहे. या मुळे मराठीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची नैतिक जबाबदारी शिक्षकांच्यावरच आहे, असे प्रतिपादन चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष एम. एन. शिवनगेकर यांनी केले.
येथे भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभाग व भुदरगड तालुका मराठी अध्यापक संघ यांच्यावतीने आयोजित मराठी विषय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे होते.
साहित्यिक बी. एन. पाटील म्हणाले, ‘‘मराठी ही प्राचीन भाषा असून यामध्ये साहित्याचा विपुल खजिना उपलब्ध आहे. शिक्षकांनी या समृद्ध साहित्याची विद्यार्थ्यांना ओळख करुन देण्याबरोबरच व वाचन- लेखनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे.’’
साहित्यिक संजय साबळे म्हणाले, ‘‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त लेखन क्षमतांचा विकास करण्यासाठी त्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रेरित केले पाहिजे. त्यातून उद्याचे लेखक जन्माला येवून त्यांच्या हातून मराठीचे समृद्ध साहित्य निर्माण होईल.’’
यावेळी विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडविण्यासाठी मराठी विषय हस्ताक्षर सुधार कार्यशाळा, निंबध लेखन स्पर्धा, काव्य लेखन- वाचन व गायन कार्यशाळा, अवांतर वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच मराठी विषयातील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व पालक सत्कार समारंभ नियोजनाबाबत चर्चा झाली. तसेच भुदरगड तालुका मराठी अध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी निवड केली.
मुख्याध्यापक एम. व्ही. लाड, सुभाष पाटील, ए. डी. खतकर, माजी सभापती आक्काताई नलवडे, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, मुख्याध्यापिका आर्या पाटील, मारुती मुसळे, सदाशिव करडे, गुलाब लांडगे, बी. डी. कांबळे, युवराज बिरंबोळे व शिक्षक उपस्थित होते. एम. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आर. पी. गव्हाणकर यांनी आभार मानले.