
गारगोटी : ऊस वाहतूकदार मेळावा
02979
गारगोटी : येथील वाहनधारकांच्या मेळाव्यात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी. शेजारी राहुल देसाई, धनाजी देसाई आदी.
...
मुकादमांइतकेच कारखानदार फसवणुकीस जबाबदार
राजू शेट्टी : गारगोटीत ऊस वाहतूकदारांचा मेळावा
गारगोटी, ता. १३ : ‘गतवर्षी १०,२५८ मुकादमांनी वाहनधारकांची फसवणूक केली असून आंधळा विश्वास ठेवल्याने त्यांनी गळा चिरला आहे. यापुढे कारखानदारांनी साथ नाही दिली तर त्यांची दुकानदारी बंद पडण्याची ताकद वाहनधारकांच्यात आहे. कारखान्यांची शेती कार्यालये ही मुकादमाइतकीच दोषी असल्याने कारखानदारांच्या कानाचा गड्डा धरावा लागणार आहे’, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
येथील जोतिर्लिंग मंदिरात आयोजित केलेल्या सर्वपक्षीय ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. युवक नेते राहुल देसाई, जीवन पाटील, धनाजी देसाई, माजी सभापती बाबा नांदेकर प्रमुख उपस्थित होते.
श्री. शेट्टी म्हणाले, ‘सर्व कारखान्यांनी त्यांची गाळप क्षमता वाढविली आहे. गाळपाचा कालावधी अत्यंत कमी झाला आहे. या परिस्थितीत वाहतूकदार जर उध्दवस्त झाला तर कारखानदारी मोडीत निघायला वेळ लागणार नाही. मुकादम हे लेबर कॉन्ट्रक्टर आहेत. त्यांना त्यांच्या कामाचे कमिशन हे काम पूर्ण झाल्यावर दिल्यास वाहतूकदारांची फसवणूक होणार नाही. आता कारखान्यांनी विचार करण्याची गरज आहे. सर्व वाहतूकदारांनी कायद्याच्या चाकोरीत राहून करार केले पाहिजेत.’
दरम्यान, कूर येथून ट्रॅक्टर रॅली काढून पाहुण्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. भिकाजी पाटील, प्रकाश कदम, पृथ्वीराज पवार, संदिप राजोबा यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल हळदकर यांनी स्वागत केले. सरपंच बाळासाहेब भालेकर यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले. वसंतराव प्रभावळे, संजय देसाई, रामभाऊ देवर्डेकर, अरुण शिंदे, नारायण पाटील, राजेंद्र गोडसे, सदाशिव चव्हाण आदी उपस्थित होते.
...