
गारगोटी : आवश्यक केपी मेळावा
03004
वासनोली : बिद्री साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात बोलताना के. पी. पाटील. समोर उपस्थित सभासद, कार्यकर्ते.
...
‘बिद्री’त अभद्र युती करणार नाही
के. पी. पाटील ः वासनोली येथे कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा
कडगाव, ता. २९ : ‘बिद्री साखर कारखाना हा सर्वसामान्य सभासद व कर्मचाऱ्यांच्या पाठबळावर राज्यात आदर्शवत चालवला आहे. निवडणुकीला सामोरे जाताना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊ, मात्र अभद्र युती करणार नाही’, असे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी सांगितले. वासनोली (ता. भुदरगड) येथे बिद्री निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘बाजार समिती व तालुका संघाच्या निवडणुकीत अपरिहार्य कारणाने युती करावी लागली. माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव गट, राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना अशी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. यापूर्वी दिनकरराव जाधव गटाशी संघर्ष होत होता. या निवडणुकीत आम्ही व जाधव गट एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. बिद्री साखर कारखान्यातील दिनकरराव जाधव यांचे योगदान विसरता येणार नाही. आम्ही १२७ कोटींचा सहवीज प्रकल्प उभारला, इथेनॉल प्रकल्प अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबरपासून कार्यान्वित करण्याचा मानस आहे. बिद्रीच्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नाही. बिद्रीचा कारभार अगदी चोख असून कर्मचाऱ्यांचा पगार, महाराष्ट्रात उच्चांकी ३२०९ रुपये दर, ऊस दर, तोडणी वाहतूक बिले वेळेत जमा होत आहेत. राज्यस्तरीय व देश पातळीवरील अनेक पुरस्कार बिद्रीला मिळाले आहेत.’
संचालक धनाजीराव देसाई म्हणाले, ‘बिद्री कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची ही वज्रमूठ सभा आहे.’ माजी उपसभापती सत्यजित जाधव म्हणाले, ‘बिद्री साखर कारखान्याच्या मागील अनेक निवडणुका दिनकरराव जाधव गटाने लढविल्या. विरोधी बाजूला पॅनलप्रमुख म्हणून चेहरा नसल्याने बिद्रीची निवडणूक एकतर्फी होईल.’ शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेत पाळ्याचाहुडा येथील माजी उपसरपंच महादेव देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला.
माजी सभापती विलास कांबळे यांनी स्वागत केले. बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, पंडितराव केणे, राजेंद्र पाटील, के. ना. पाटील, प्रवीण भोसले, उमेश भोईटे, श्रीपती पाटील, शेखर देसाई, सुभाष सोनार, प्रकाश डेळेकर, काशिनाथ देसाई, दिनकर रेपे आदी उपस्थित होते. बाळासाहेब भालेकर यांनी आभार मानले.
...
निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकू
के. पी. पाटील म्हणाले,‘ बिद्रीचा वजन काटा हा धर्मकाटा आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. विरोधकांनी चांगल्या कामाचे कौतुक करावे, विरोधकांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी मुद्दे नसल्याने होणारी निवडणूक आम्हीच प्रचंड मताधिक्याने जिंकू.’