
गारगोटी : शिवसेना धरणे आंदोलन
03013
गारगोटी : नळपाणी पुरवठा योजनांच्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी शेखर जाधव यांना देताना जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रकाश पाटील, अविनाश शिंदे आदी.
....
नळपाणी योजना कामातील
गैरव्यवहाराची चौकशी करा
शिवसेनेची मागणी : भुदरगड गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
गारगोटी, ता. ३ : भुदरगड तालुक्यातील नळपाणी पुरवठा कामात अधिकाऱ्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. यावेळी गटविकास अधिकारी शेखर जाधव यांना याप्रकरणी चौकशीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले, ‘अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांना अनेक गावांची कामे मिळवून दिली आहेत. पंधरा टक्केपेक्षा अधिक दराने अंदाजपत्रके केली आहेत. पैसे मिळविण्याच्या हेतूने योजनेच्या किमती भरमसाठ वाढवून त्यामध्ये ठेकेदारांशी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याप्रकरणी खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.’
जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण आराखडा, अंदाजपत्रक सर्व्हे करण्याची जबाबदारी संबंधित शाखा अभियंता यांची असताना ठेकेदारांशी संगनमत करून ठेकेदारांनी आपल्याला हवे तसे खासगी यंत्रणेकडून सर्व्हे करून घेतले आहेत. याकडे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे.’
यावेळी तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, उपतालुकाप्रमुख अशोक पाटील, थॉमस डिसोझा, वसंत कांबळे, अशोक दाभोळे, बचाराम गुरव आदी उपस्थित होते.