वाशीतील बिरदेव मंदिर ट्रस्ट वर प्रशासक नेमण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीतील बिरदेव मंदिर ट्रस्ट वर प्रशासक नेमण्याची मागणी
वाशीतील बिरदेव मंदिर ट्रस्ट वर प्रशासक नेमण्याची मागणी

वाशीतील बिरदेव मंदिर ट्रस्ट वर प्रशासक नेमण्याची मागणी

sakal_logo
By

वाशीतील बिरदेव ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मनमानी
---
आजी अध्यक्षांसह सदस्यांचा आरोप; चौकशी होईपर्यंत प्रशासक नेमण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
हळदी, ता. ९ ः वाशी (ता. करवीर) येथील बिरदेव मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाने (ट्रस्ट) केलेल्या बेकायदेशीर कारभाराची गतीने चौकशी करावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत धर्मादाय कार्यालयामार्फत ट्रस्टचे दफ्तर जप्त करून प्रशासक नेमावेत, अशी मागणी ट्रस्टचे माजी अध्यक्ष, सदस्य व धनगर समाजातील प्रतिनिधींनी वाशी येथे पत्रकार परिषदेत केली.
निवेदनात म्हटले आहे, की वाशी येथील बिरदेव मंदिराचा कारभार पाहण्यासाठी धनगर समाजातर्फे १९९१ मध्ये धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करून विश्वस्त मंडळ (ट्रस्ट) स्थापन केले; परंतु २०१७ पासून विश्वस्त मंडळावर कार्यरत पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. शासनाची नियमावली डावलून बकऱ्यांचा बळी देणे, भक्तांच्या धार्मिक भावनेचा आदर न ठेवता वज्रलेप करताना देवाच्या मूर्तीचे मूळ रूप बदलणे, रोष आला असता पुन्हा नवी मूर्ती बसवून जुन्या मूर्तीचे अवशेष परस्पर लपविणे, एका पदाधिकाऱ्याकडून मंदिर परिसरात विनापरवाना वृक्षतोड केली जाणे, दानपेटी, दागिने यांच्यासह मंदिराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहेत.
याबाबत २१ जूनला धर्मादाय उपायुक्तांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली. संबंधित कार्यालयाकडून चौकशीच्या निमित्ताने तक्रारदार व विश्वस्तांचे जबाब घेतले; पण सुरू असलेली चौकशी पूर्णतः संथपणे सुरू आहे. यामुळे विद्यमान पदाधिकारी कागदपत्रांमध्ये हवा तसा बदल करून बचावाचे काम करीत आहेत. त्यामुळे चौकशी गतिमान करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत धर्मादाय कार्यालयाकडून प्रशासक नेमून कार्यालयाचे दफ्तर ताब्यात घेत या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेस लक्ष्मण पुजारी, सुनील रानगे, धनाजी रानगे, शिवाजी रानगे, आनंदा रानगे उपस्थित होते.


मंदिरात बुवाबाजी किंवा भोंदूगिरी असे प्रकार घडत नाहीत. श्रद्धेपोटी बकऱ्यांचा बळी दिला जातो; पण तो ज्याचा-त्याचा वैयक्तिक विषय असून, त्याच्याशी ट्रस्टचा संबंध नाही. मूर्तीची झीज झाल्याने दुरुस्तीसाठी ‘धर्मादाय’कडे पत्रव्यवहार केला होता; पण त्यासाठी कोणती नियमावली नसल्याचे कळविल्यानंतर सभेत ठराव करून मूर्तीची डागडुजी केली आहे. मंदिरात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. देवाचे दागिने व दानपेटीतील रकमेच्या नोंदी रीतसर घातल्या आहेत. धर्मादाय कार्यालयाकडून करण्यात येणाऱ्या चौकशीला पूर्ण सहकार्य करीत आहोत.
- अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य, बिरदेव देवालय ट्रस्ट, वाशी

Web Title: Todays Latest Marathi News Hld22b01035 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..