त्या तोडलेल्या झाडांचे अद्यापही पंचनामे नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्या तोडलेल्या झाडांचे अद्यापही पंचनामे नाहीत
त्या तोडलेल्या झाडांचे अद्यापही पंचनामे नाहीत

त्या तोडलेल्या झाडांचे अद्यापही पंचनामे नाहीत

sakal_logo
By

‘वन’कडून पंचनाम्यास चालढकल
परिते मार्ग बेकायदा वृक्षतोड प्रकरण; यादीत नसलेल्या झाडांचीही तोड

साईनाथ पाटील,

हळदी, ता. २१ ः कोल्हापूर-परिते मार्गावर रस्त्याच्या कामानिमित्ताने रस्त्यालगतची निवडक झाडे तोडण्यास परवाना दिला असतानादेखील ठेकेदाराने मनमानी पद्धतीने बेकायदेशीर वृक्षतोड केली आहे. पण आज दिवसभरात वनविभागाकडून घटनास्थळावर जाऊन पंचनामे होणे गरजेचे असतानाही वन विभागामार्फत कोणीही घटनास्थळी फिरकलेदेखील नाही. हे पंचनामे करण्यास वन विभागाकडून चालढकल का होत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेली चार वर्षांपासून या मार्गाचे रखडलेले काम अनेकदा वादग्रस्त ठरले आहे. भर म्हणून कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांची तोड करण्यास वन विभागाकडून एका ठेकेदाराला दिलेले काम आता वादात सापडले आहे. संबंधित ठेकेदाराने त्याला ठरवून दिलेल्या झाडांची तोड करण्याऐवजी स्वतःच्या आर्थिक फायद्याचा विचार करुन परवाना यादीत नसलेल्या झाडांवर चुकीचे क्रमांक टाकून त्यांची तोड केली आहेत. ज्यात धावडा, सावर, करंज अशा यादीत नसलेल्या झाडांचा समावेश आहे.
याबाबत दै. ‘सकाळ’मार्फत आवाज उठवला असता करवीर वनपाल विजय पाटील यांनी संबंधित घटनेचा तत्काळ पंचनामा करुन चुकीच्या पद्धतीने तोड केली असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. कामाचा परवाना रद्द केला जाईल, असे आश्वासन दिले होते. आज दिवसभरात वन विभागाचे अधिकारी सोडाच; पण इतर कोणी कर्मचारीसुद्धा घटनास्थळी फिरकलेही नाहीत.

चौकट -
तात्पुरता परवाना की अमर्याद अधिकार...
वन विभागाकडून परवाने दिल्यानंतर झाडे तोडण्याचे काम योग्य पद्धतीने सुरु आहे की नाही हे जागेवर जाऊन पाहण्याचे कष्ट वन विभागाकडून घेतले जात नाहीत. याचा गैरफायदा ठेकेदार घेतात आणि मनमानी पद्धतीने झाडे तोडली जातात. मग हा परवाना तात्पुरता आहे की ठेकेदाराला दिलेले अमर्याद अधिकार आहेत, असा प्रश्न पडतो.

कोट
कार्यालयाच्या इतर कामांमुळे आज पंचनामे करण्यास जाता आले नाही. सध्या त्या ठेकेदाराला तात्पुरते काम थांबवण्यास सांगितले आहे. दोन दिवसांत वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्यासोबत आम्ही पंचनामे करणार आहोत.
- विजय पाटील,
वनपाल,करवीर