‘कांडगाव’कडे ‘करवीर’चे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कांडगाव’कडे ‘करवीर’चे लक्ष
‘कांडगाव’कडे ‘करवीर’चे लक्ष

‘कांडगाव’कडे ‘करवीर’चे लक्ष

sakal_logo
By

‘कांडगाव’कडे ‘करवीर’चे लक्ष
साईनाथ पाटील : सकाळ वृत्तसेवा
हळदी, ता ११ : कांडगाव (ता. करवीर) येथील यंदाची ग्रामपंचायत निवडणूक तालुक्यातील लक्षवेधी निवडणूक ठरत आहे. लोकनियुक्त सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने पॅनल प्रमुखांच्या घरातीलच दोन माजी पदाधिकाऱ्यांमध्ये थेट लढत होत आहे. माजी पंचायत समिती सदस्य जयश्री आनंदराव मेडसिंगे विरुद्ध माजी सरपंच तेजस्विनी अनिल चव्हाण अशी निवडणूक होत असल्याने पंचक्रोशीसह करवीर तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकांतील पारंपारिक राजकीय विरोधी असणारे गट ग्रामपंचायतसाठी देखील एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत असल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याबरोबरच घरातीलच उमेदवारांमुळे पॅनल प्रमुखांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरत आहे. यात सत्ताधाऱ्यांची राष्ट्रीय काँग्रेस (आय) प्रणित राजर्षी शाहू ग्रामविकास आघाडी विरुद्ध विरोधी गटाची छत्रपती शिव-शाहू ग्रामविकास आघाडी असा सामना होणार आहे. यात सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व आमदार पी. एन. पाटील यांचे समर्थक, काँग्रेस नेते दिगंबर मेडसिंगे करत असून विरोधी आघाडीचे नेतृत्व माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे उदय चव्हाण व मंत्री चंद्रकांत पाटील यांचे समर्थक, भाजप नेते दत्तात्रय मेडसिंगे करत आहेत.
एकंदरीत ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध नरके गट व भाजप अशी होत असली तरी आगामी पंचायत समिती निवडणुकीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदानात मोठी भूमिका पार पाडणाऱ्या कांडगाव सारख्या मोठ्या गावातील नेतृत्वाचा पंचक्रोशीत प्रभाव पाडणारी निवडणूक ठरणार आहे.
-----------------
चौकट
कामांचा लेखाजोखा
सत्ताधारी गटाच्या उमेदवार जयश्री मेडसिंगे या २०१२ ते २०१५ दरम्यान करवीर पंचायत समिती सदस्या होत्या, तर विरोधी गटाच्या उमेदवार तेजस्विनी चव्हाण या २०१२ ते २०१७ या काळात गावच्या सरपंच होत्या. तसेच मेडसिंगे यांच्या घरातीलच रूपाली मेडसिंगे या मागील पाच वर्षे लोकनियुक्त सरपंच होत्या. त्यामुळे दोन्ही आघाड्यांकडून सत्तेत असताना केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला जात आहे.
---------
दृष्टिक्षेपात
- प्रभाग - ४
- एकूण मतदार - २८०८
- सरपंच पदासह एकूण उमेदवार - २४