
मजलेसाठी पाच कोटींची नळयोजना
मजलेसाठीच्या योजनेस तत्वतः मान्यता
अरुण इंगवले यांची माहिती; ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबणार
हातकणंगले, ता. १२ ः अनेक वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील मजले गावाला जलजीवन मिशनअंतर्गत ४ कोटी ९१ लाखांच्या पाणी योजनेस तत्वत: मान्यता मिळाली आहे. अंतिम मंजुरीसाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अरुण इंगवले यांनी दिली. यासोबत जिल्ह्यातील आणखी चार योजनांचे प्रस्तावही पाठवल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली परवड लवकरच थांबणार आहे.
हातकणंगले तालुक्यातील १४ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जात होता; मात्र यापैकी प्रत्येक गावाने स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित केल्याने व २०१३ मध्ये योजना कालबाह्य झाल्याने बंद पडली. स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेपासून वंचित राहिलेल्या आळते, मजले, तिळवणी या गावांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. पैकी आळते ग्रामपंचायतीने माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांच्या सहकार्याने कालबाह्य योजना काही काळ चालू ठेवली होती. त्यानंतर इंगवले यांच्या प्रयत्नातून आळतेसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती; मात्र मजलेतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली होती.
आळते मजले असा संयुक्त प्रस्ताव होता; मात्र आळते गावची वाढती लोकसंख्या व वाढीव भाग यामुळे ही योजना बारगळली. अखेर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मजले गावासाठी जलजीवन मिशनअंतर्गत स्वतंत्र प्रस्ताव दिला होता. अखेर ४ कोटी ९१ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मजले गावचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
पुणे येथील जलजीवन मिशन तांत्रिक छाननी समितीच्या मान्यतेने गुरुवारी कोकण भवन मुंबई येथे तांत्रिक मान्यतेसाठी जिल्हा परिषद प्रशासक संजयसिंह चव्हाण, कार्यकारी अभियंता ढगे यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवल्याची माहिती श्री. इंगवले यांनी दिली.
--------------
कार्यकाळात मजलेसाठी कोणत्याही परिस्थितीत पाणी योजना सुरू करायची असा निश्चिय केला होता. सातत्याने पाठपुरावा केल्याने एक टप्पा पूर्ण झाला.
-अरुण इंगवले, माजी जिल्हा परिषद सदस्य.
Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01821 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..