
शाहू कालीन तलावाला धोका..
02557
२५५८
अतिग्रेतील शाहू तलावात उत्खनन
महसूल विभाग डोळस; सुटीची संधी साधत माफियांकडून मुरुमाची राजरोस चोरी
अतुल मंडपे ः सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. ८ ः अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील शाहूकालीन राजर्षी शाहू तलावामध्ये बेकायदेशीररित्या मुरुमाचे उत्खनन सुरू आहे. परिणामी तलावाच्या पाया आणि बंधाऱ्याला धोका होऊन भविष्यात शेती, वित्त आणि मनुष्यहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तत्कालीन तहसीलदारांनी २०१३ मध्ये आदेश काढून उत्खननाला बंदी केली असताना जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी गौणमाफियांकडून विक्री सुरू आहे. तलाठी आणि तहसील प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे.
या तलावाची बांधणी शाहू महाराजांनी काळ्या मातीचा वापर करून केली. बंधारा मजबूत होण्यासाठी त्यावेळी हत्तीना फिरवल्याच्या नोंदी आहेत. ६७ एकरांत विस्तारलेल्या तलावामध्ये रामलिंग, धुळोबा, अलमप्रभू डोंगरमाथ्यावरून पाणी येते. एक वेळ तलाव भरला की तीन वर्ष गावाला पाणी पुरते. अशा या वैभवशाली तलावामध्ये माफियांकडून राजरोसपणे खोदाई केली जात आहे. गौणमाफियांकडून तलावाच्या खोलीकरणाचे आणि विहिरींना पाझर पाणी येण्याचे कारणे सांगून खोदाई केली जात आहे. तत्कालीन तहसीलदारांनी २३ जानेवारी २०१३ ला आदेश काढून शाहू तलावात खोदाईला बंदी घातली आहे. तरीही मुरुम माफीया सुटीची संधी साधत रात्री मुरुमाची खोदाई करत आहेत. या खोदाईमुळे तलावाच्या मुळ बांधाला आणि बंधाऱ्याला धोका पोहोचू शकतो.
कोट
शाहू तलावात मुरुम खोदाई झाली आहे. वस्तुस्थितीचा जागेवर जाऊन पंचनामा केला आहे. याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयाकडे दिला आहे. वरिष्ठ काय निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी होणार आहे.
- नितीन जाधव, गावकामगार तलाठी, अतिग्रे
तलावात अवैधपणे मुरूम खोदाईची माहिती आजच मिळाली आहे. पाहणीसाठी तलाठ्यांना पाठवले आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल.
- कल्पना ढवळे, तहसीलदार, हातकणंगले
Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01862 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..