
पाणीपुरवठ्यासाठी घागर मोर्चाचा इशारा
पाणीपुरवठ्यासाठी घागर मोर्चाचा इशारा
हातकणंगले, ता. २५ ः काही महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळेच मुबलक, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी उद्या (ता. २६) सकाळी नागरिकांनी घागर मोर्चाचा इशारा दिला आहे.
वर्षभर आवश्यक तितके पाणी मिळाले नसल्याने यंदाची पाणीपट्टी पूर्णतः माफ करावी. तसेच, ताबडतोब यावर योग्य ती उपाययोजना करून शहराला मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा नियमितपणे केला जावा, याबाबत चर्चा करण्यासाठी काल (ता. २४) नागरिकांची बैठक झाली. या वेळी घागर मोर्चाचे नियोजन केले असून, पदाधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्याचा निर्णय घेतला. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांचा रोष पाहून काही नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांमध्ये आज टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत मोर्चाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, नागरिकांमधून सोशल मीडियावर टीका सुरू आहे.