
हातकणंगलेत कचऱ्याचे ढीग तसेच
03097
हातकणंगले ः जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग व गटारी तुंबल्या आहेत.
----------
हातकणंगलेत कचऱ्याचे ढीग तसेच
ठेक्यापोटी ९० लाख रुपये खर्च; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
हातकणंगले, ता. १२ ः वर्षभरात शहरातील कचरा उठावाच्या ठेक्यापोटी तब्बल ९० लाख रुपये खर्च होऊनही शहराच्या अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जसेच्या तसे आहेत. गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून साथीच्या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय ठेकेदार कंपनीकडून करारातील अटी, शर्तीचा भंग करणे, ओला, सुका कचरा वेगळा न उचलणे, खराब वाहनांचा वापर केला जात असल्याने कचरा उठावाचा ठेकाच वादात सापडला आहे.
हातकणंगले नगरपंचायतीने फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रथम कंपनीला सात महिन्यांसाठी ५२ लाख रुपयांना कचरा उठावाचा ठेका दिला. मात्र, त्या कंपनीनेही समाधानकारक काम न केल्याने त्या कंपनीविरोधात थेट जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तक्रारी झाल्या. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये दुसऱ्या कंपनीला ३७ लाखांना पाच महिन्यांसाठी ठेका दिला. अशाप्रकारे ८९ लाख रुपये वर्षभरात कचरा उठावावर खर्च झाले आहेत. मात्र, जागोजागी कचऱ्याचे ढीग तसेच आहेत. बहुतेक सर्व गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची उत्पत्ती होऊन साथीच्या रोगांना निमंत्रण मिळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्याच्या कंपनीकडून वापरली जाणारी वाहने अनेक वेळा वाहने मध्येच बंद पडतात, वाहनांना नंबर प्लेट नाहीत, ओला-सुका कचरा वेगळा गोळा केला जात नाही. तरीही प्रशासन त्यांना जाब विचारत नाही. त्यामुळे हा ठेकाच वादांत सापडला आहे.
------------
कंपनीच्या कामकाजाबाबत त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. कामात कुचराई केल्यास त्यांच्याकडून वेळोवेळी बिलातून रक्कम वजा केली जाते. नियमबाह्य काम करणाऱ्यावर निश्चितच सक्त कारवाई केली जाईल.
- प्रदीप बोरगे,
आरोग्य अधिकारी, नगरपंचायत, हातकणंगले