हुपरीत आठवडा बाजारा दिवशी वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरीत आठवडा बाजारा दिवशी वाहतूक कोंडी
हुपरीत आठवडा बाजारा दिवशी वाहतूक कोंडी

हुपरीत आठवडा बाजारा दिवशी वाहतूक कोंडी

sakal_logo
By

हुपरीत आठवडा बाजारादिवशी वाहतूक कोंडी
पोलिस, पालिका प्रशासनाने शिस्त लावण्याची मागणी; स्वतंत्र पार्किंग व्यवस्थेची आवश्यकता
हुपरी, ता.२२: अतिक्रमणे, रस्त्यावरच मांडले जाणारे खाद्यपदार्थ आणि वस्तू विक्रीचे स्टॉल्स त्यात अस्ताव्यस्त पार्किंगची भर यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर शनिवार व बुधवार या आठवडा बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. अतिक्रमणे हटवण्याबरोबरच सम विषम तारखांना पार्किंग, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. पोलिस तसेच पालिका प्रशासनाने लक्ष देऊन आठवडा बाजाराला तसेच पार्किंग व्यवस्थेला शिस्त लावण्याची मागणी होत आहे.
शहरात दर शनिवारी व बुधवारी आठवडा बाजार भरला जातो. शनिवारचा बाजार हा गावभागात तर बुधवारचा बाजार हा माळभागात भरतो. दोन्ही बाजारात धान्य, भाजीपाला, कपडे, फळे याबरोबरच विविध खाद्यपदार्थ वस्तू विक्रेते, व्यावसायिक, व्यापारी यांची गर्दी असते. खरेदीसाठीही नागरिकांची गर्दी असते. शनिवारच्या बाजारादिवशी दुपारनंतर गावभागात वाहतुकीची कोंडी जाणवायला लागते. मुख्य बसस्थानक परिसर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरच विक्रेते ठाण मांडतात. खरेदीसाठी आलेले लोक रस्त्याकडेलाच वाहने उभी करतात. काही विक्रेते, व्यावसायिक व दुकानदार चारचाकी रस्त्यावरच उभी करतात. कोणत्याही दिशेने कशाही पद्धतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. अशावेळी इतर वाहनांना वाट काढताना चालकाना जिकिरीचे झाले आहे. अंबाबाई मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही समस्या भेडसावत आहे.
बुधवारच्या आठवडा बाजाराची स्थिति यापेक्षा वेगळी नाही. नवीन बसस्थानक ते महावितरण कार्यालयापर्यंतचा मार्ग विविध व्यावसायिक, विक्रेते यांच्या अतिक्रमणांनी वेढला आहे. टपऱ्यांची वाढलेली अतिक्रमणे, रस्त्यावरच ठेवले जाणारे दुकानांचे बोर्ड आदी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. आबा नाईक शाळा परिसर तर वाहतूक कोंडीचा अड्डा बनला असून अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे.
----------
॰ हे व्हायला हवे....
* रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना प्रतिबंध
* बाजारा दिवशी जुने बस स्थानक तसेच आबा नाईक शाळा परिसरात वाहतूक पोलिस आवश्यक
* बाजाराला येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ
* सम विषम तारखांना पार्किंग
* मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याबरोबरच मोहिमेत सातत्य
---------
पालिकेतर्फे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात प्रयत्न केले आहेत. यापुढेही अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पार्किंग व्यवस्थेसंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन असून तो लवकरच अंमलात आणला जात आहे.
-जावेद मुल्ला, बांधकाम अभियंता, हुपरी पालिका
---------
आठवडा बाजार दिवशी गर्दीच्या ठिकाणी पोलिस तसेच होमगार्डची व्यवस्था करून वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करू. पार्किंग व्यवस्था तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे पालिका प्रशासनाशी समन्वय साधून दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-पंकज गिरी, सहायक पोलिस निरीक्षक, हुपरी

Web Title: Todays Latest Marathi News Hup22b01959 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top