
सहा डिसेंबरला हूपरीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि दर्शनासाठी खुल्या
02036
हुपरी : चांदीचा कलश सुपूर्द करताना कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे. सोबत मनोहर जोशी व इतर.
डॉ. आंबेडकरांच्या अस्थी
हुपरीत ६ रोजी खुल्या
हुपरी, ता.३ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथे श्रद्धापूर्वक जपलेल्या पवित्र अस्थी महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबरला दर्शनासाठी खुल्या केल्या जातील. मुंबईत चैत्यभूमीवर जाणे शक्य नसलेल्या अनुयायांची पावले अस्थी दर्शनासाठी हुपरीकडे वळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन, बौद्ध समाज, स्मारक समितीतर्फे नियोजन होत आहे.
डॉ. आंबेडकरांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार झाले होते. त्यावेळी येथील अनुयायांनी मिळेल त्या मार्गाने मुंबई गाठून महत्प्रयासाने बाबासाहेबांच्या अस्थी येथे आणल्या. त्या अस्थी डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात स्मारक उभारून जपल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा व परिसरात बाबासाहेबांच्या अस्थी असणारे एकमेव ठिकाण म्हणून हुपरीचा लौकिक अलीकडे वाढत आहे. साहजिकच अस्थी दर्शनासाठी जिल्ह्यासह सांगली तसेच कर्नाटक भागातून आंबेडकरी अनुयायी गर्दी वाढत चालली आहे.
दरम्यान, आमदार प्रकाश आवाडे यांनी अस्थींचे पावित्र्य जपण्यासाठी चांदीचा कलश देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आमदार आवाडे यांनी माजी खासदार कललाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते कलश स्मारक समितीकडे आज सुपूर्द केला. यावेळी कार्यकारी संचालक मनोहर जोशी, नगरसेवक सूरज बेडगे, उपाध्यक्ष बाबासो चौगुले, अण्णासाहेब गोटखिंडे, किरण कांबळे, सुभाष मधाळे, विद्याधर कांबळे, आनंदराव कांबळे उपस्थित होते.