
हुपरी शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध
हुपरीचा विकास
आराखडा प्रसिद्ध
हुपरी, ता. ९: बहुचर्चित हुपरी शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा आज प्रसिद्ध झाला आहे. तो पालिका, नगर रचना विभाग कोल्हापूर, मंडल अधिकारी व नगर भूमापन कार्यालय येथे पहायला उपलब्ध असून त्यावरील नागरिकांच्या सूचना, हरकती आराखड्याची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत विचारात घेतल्या जाणार आहेत.
शहरातील मोकळ्या जागा तसेच शेतजमिनी यावरील आरक्षणाचा प्रारूप विकास आराखड्यात समावेश असून जमिनीवर आरक्षण पडण्याच्या भीतीने अल्प भुधारक, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक धास्तावले आहेत.
२६ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्याचा ठराव मंजूर झाला. राज्य शासनातर्फे त्याबाबतची अधिसूचना २४ जून २०२१ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाली. त्यानूसार नगर रचना अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक नगर रचना विभाग कोल्हापूर यांची शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी २२ एप्रिल २०२१ ला नियुक्त केली. नगररचना अधिकाऱ्यांनी विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करून शहराचा प्रारूप विकास आराखडा पालिकेकडे डिसेंबर २०२२ मध्ये प्रसिद्धीसाठी हस्तांतरित केला होता. पालिकेत सध्या प्रशासक राज्य आहे. मुख्याधिकारी विशाल पाटील प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. अखेरीस तीन महिन्यांनी त्यांनी हा प्रारूप विकास आराखडा लोकांसाठी आज खुला केला. त्यानुसार प्रारूप विकास आराखड्याचे नकाशे व तपशिल उपलब्ध होणार आहेत.
-----------
महिला बुद्धिबळ
स्पर्धा उद्या
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने लायन्स क्लबतर्फे शनिवार (ता. ११) सकाळी दहा वाजता महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. येथील लायन्स ब्लड बँक, दाते मळा येथे स्पर्धा होणार आहेत. स्विस लीग पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धा मुली व महिलांच्या एकत्र गटात होणार आहेत. स्पर्धेनंतर सायंकाळी पाच वाजता विजेत्या मुली व महिला खेळाडूंना ३८ आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत अधिकाधिक महिला खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.