
चैत्र पालवीला रसिकांची दाद
02241
हुपरी: अंबाबाई भक्त मंडळ व लोककलाकार संघ यांच्या सहकार्याने ‘चैत्र पालवी’ संगीत सोहळ्यातील मैफीलप्रसंगी अमृतधारा गीत मंचचे कलाकार.
------------
चैत्र पालवीला रसिकांची दाद
हुपरीत भाव, भक्तीगीतांची मैफल; गुढीपाडव्यानिमित्त आयोजन
हुपरी, ता. २४ : गुढीपाडवा उत्सवानिमित्त येथे श्री अंबाबाई भक्त मंडळ व लोककलाकार संघ यांचे सहकार्याने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ‘चैत्र पालवी’ संगीत सोहळा झाला. यावर्षी सागर जोशी निर्मित व माऊली क्रिएशन प्रस्तुत अमृतधारा गीत मंच यांच्या अवीट गोडीच्या भावगीत, भक्तीगीतांनी चैत्र पालवी मैफिल बहरली.
श्री गणरायाच्या आराधनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ओम नमः शिवाय, नवरात्रीला नव रुपे तू, ये हंसावरती बसून शारदे... या भक्ती गीतांबरोबर समस्त वारकरी बांधव आणि भागवत सांप्रदायाची ठायी ठायी आठवण करून देणारी ज्ञानेश्वर माऊली व संत तुकोबा यांच्या रचनेतील पंढरीरायाची अभंगवाणी, श्रध्दा आणि भक्तीची महती आणि जाणीव करुन देणारी महाकथानके, महाभारत व रामायण यामधील श्रीकृष्ण सखा आणि प्रभू रामचंद्र यांची महती सांगणारी काही भक्ती गीते सादर केली.
मराठमोळी संस्कृती आणि माझा शेतकरी राजा यावर आधारित सिनेगीतांबरोबरच भावगीते, जोगवा, गोंधळ गीते, तसेच स्वरा विभुते या चिमुकल्या गायिकेने गायिलेल्या ‘झाल्या तिन्ही सांजा...’ या गीताने तर मैफील आणखीन रंगतदार झाली. विविध संगीत पैलुने या चैत्र पालवीचा बहर वाढतच गेला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने व अंबामातेच्या आरतीने सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी गायन सेवा नेहा कोळी, समृद्धी पोतदार, श्रावणी वाशीकर, अथर्व देशपांडे, वल्लभ देशपांडे, स्वरा विभुते यांची लाभली. संगीत संयोजन सागर जोशी (हार्मोनियम), अनिल कुलकर्णी व सुधीर कुलकर्णी (तबला), सुरेश जाधव (ढोलकी/निवेदन ), ज्ञानेश महाजन (तालवाद्य) यांची तर ध्वनी संयोजन भरत तेली यांचे लाभले. भक्त मंडळाचे यशवंतराव पाटील, प्रकाश देशपांडे, अँड.लालासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.