
हरकती नोंदवण्यासाठी मुदतवाढ मिळावी
हरकती नोंदवण्यासाठी मुदतवाढ मिळावी
आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिशनतर्फे मागणी; हुपरी प्रारूप विकास आराखडा
हुपरी, ता. २५ : शहराचा प्रसिद्ध झालेला प्रारूप विकास आराखडा सदोष आहे. त्यावर हरकती घेण्यासाठीचा कालावधी तीस दिवसांचा असला तरी या कालावधीत आलेल्या विविध शासकीय सुट्टया आणि अधिकाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती याचा विचार करता अपुरा पडत आहे. विहीत मुदतीत हरकती किंवा सूचना सादर करणे लोकांसाठी क्लिष्ट बनले आहे. त्यामुळे हरकती नोंदवण्यासाठी आणखी एक महिना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिशनतर्फे पत्रकार परिषदेत केली आहे.
अभियंता संदीप उलपे, रमेश कुंभार म्हणाले, ‘पालिकेने प्रसिद्ध केलेल्या विकास आराखडा खासगी कंपनीने केलेला आहे. त्यात अनेक चुका दिसून येत आहेत. आराखडा तयार करताना आवश्यक असणारा विद्यमान भूवापर नकाशाचा सखोल सर्वे झालेला नाही. प्रस्तावित भूवापर (झोनिंग ) नकाशामध्ये बऱ्याच ठिकाणी चुकीचा भूवापर (झोन कलर कोड) दिसत आहे. खाजगी मिळकतीवर सार्वजनिक निम- सार्वजनिक झोनिंग (गुलाबी रंग), काही प्लॉट मधून अंतर्गत वहिवाट रस्ते हे सिटि रोड (सी) म्हणून दर्शवले आहेत. यामुळे भविष्यात मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीचा वापर करताना निर्बंध येणार आहेत.’
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व गणेश मंदिर असलेल्या छत्रपती शिवाजी चौकापासून काही मीटर अंतरावरच मटण मार्केटचे आरक्षण प्रस्तावित आहे हे विसंगत वाटते. शनिवारी व बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजारसाठी आराखड्यात सारासार विचार केलेला नाही. सूचना, हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत २८ एप्रिल आहे. अधिकारी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस उपलब्ध असतात. त्यामुळे नागरिकांना आराखड्याबाबत व्यवस्थित माहिती व कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून निर्दोष आराखडा जाहीर केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अध्यक्ष चंद्रकांत चौगुले, उपाध्यक्ष धनाजी पाटील, रमेश कुंभार, उदय शास्त्री, अविनाश दांड, के. बी. पाटील, शहाजी कावळे, अमर भोसले आदी उपस्थित होते.