
रेंदाळ येथे घरफोडी, चार लाखाचा मुद्देमाल पळविला
रेंदाळ येथे घरफोडी, चार लाखाचा मुद्देमाल पळविला
हुपरी, ता.२ : रेंदाळ येथे झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यानी सात तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पळविची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची नोंद देण्याचे काम हुपरी पोलिस ठाण्यात सुरु होते.
याबाबतची माहिती अशी, रेंदाळ येथील बिरदेव नगर वसाहतमध्ये बाळासाहेब दत्तू हारगे हे वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा नोकरी निमित्त सिंधुदुर्ग येथे आहे. सोमवारी (ता.१) रात्रीच्या सुमारास हारगे कुटुंबीय बंगल्याच्या टेरेसवर झोपावयास गेले होते. या संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या बंद दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करून कपाट फोडून त्यामधील सोन्याचे सुमारे सात तोळयाचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. चोरट्यांनी कपाटातील कपडे व इतर साहित्य विस्कटून टाकले होते.
हारगे दांपत्य सकाळी उठून खाली आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बाळासाहेब हारगे यांनी घटनेची माहिती हुपरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरिक्षक भालचंद्र देशमुख व उपनिरिक्षक विजय मस्कर यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला असुन तपासासाठी ठसे तज्ञाना व श्वान पथकासही पाचारण केले होते. घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.