मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची आवश्यकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची आवश्यकता
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची आवश्यकता

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची आवश्यकता

sakal_logo
By

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची आवश्यकता
इचलकरंजीतील अनेक शासकीय कार्यालये भाडेतत्त्वावर; दुरवस्थेमुळे त्रास
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २७ ः शहरातील अनेक शासकीय कार्यालयांना दुरवस्थेचे ग्रहण लागले आहे. अपुऱ्‍या जागेसह इमारतींच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात कर्मचाऱ्‍यांबरोबरच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांशी शासकीय कार्यालयांकडून प्रशासकीय इमारतीची मागणी होत आहे. सध्या शहरात वीसहून अधिक शासकीय कार्यालये महापालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये भाडे तत्त्वावर स्थिरावली आहेत. काही जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये आहेत. ही कार्यालये शहरातील विविध भागांमध्ये असल्याने नागरिकांची कसरत होत असते. शहरात इतकी शासकीय कार्यालये असताना मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कधी उभारणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
इचलकरंजीची वाढती लोकसंख्या पाहता शहरास सुसज्ज व प्रशस्त प्रशासकीय इमारतीची आवश्यकता भासत आहे. शहरात प्रांताधिकारी, अप्पर तहसील, मंडल अधिकारी, तलाठी, दुय्यम निबंधक, साहाय्यक कामगार आयुक्त, नगर भूमापन, वस्त्र कमिटी, पासपोर्ट विभाग आदींसह अन्य शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये शहर व परिसरातील कोरोची, कबनूर, तारदाळ, चंदूर, खोतवाडी, रेंदाळ, हुपरी, साजणी आदी ठिकाणचे कामकाज होत असते. मात्र, यामधील अधिकतर शासकीय कार्यालये महापालिका मालकीच्या इमारतीमध्ये आहेत. महापालिकेनेही कार्यालयांना उपलब्धतेनुसार जागा दिल्याने ती शहरातील विविध ठिकाणी विखुरली आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यातच अनेक कार्यालयांना नामफलक नसल्याने परगावाहून आलेल्यांची कार्यालयांचा शोध घेताना दमछाक होते.
शहरामध्ये असलेल्या शासकीय कार्यालयांकडून दरवर्षी १६ लाख ७५ हजार रुपये महापालिकेस भाडे मिळते. मात्र, कार्यालयांना सामान्य सुविधा पुरवण्यास ही दिरंगाई होताना दिसते. त्यासोबत शहरातील अनेक कार्यालये ही पुरातन काळामध्ये बांधलेल्या वास्तूमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची सातत्याने डागडुजी करावी लागते. सध्या ही कार्यालये मुख्य रस्त्यालगत आली असल्याने पार्किंगचा प्रश्‍नही ऐरणीवर आहे. त्यामुळे शहरात सुसज्ज आणि प्रशस्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
---------------------
कार्यालयासाठी अन्य जागेची मागणी
अप्पर तहसील कार्यालय, साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्यासह अनेक शासकीय कार्यालयांनी अपुरी पडणारी जागा व कार्यालयाची झालेली दुरवस्था याबाबत अनेक वेळा तक्रार करून अन्य जागेची मागणी केली आहे. मात्र, शासन त्यांच्या मागणीबाबत गंभीर नसल्याने त्यांना तारेवरची कसरत करीत काम करावे लागत आहे.
--------------
इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालय २०१९ पासून सुरू आहे. मात्र, अद्याप तात्पुरत्या घेतलेल्या महापालिकेच्या जागेत आहे. हातकणंगलेपेक्षा अधिक कामकाज इचलकरंजी कार्यालयात होत आल्याने कार्यालयास जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे कार्यालयास सुसज्ज व प्रशस्त जागेची आवश्यकता आहे.
- शरद पाटील, अप्पर तहसीलदार, इचलकरंजी

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02782 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..