महा ई सेवा केंद्रांचे बेकायदा स्थलांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महा ई सेवा केंद्रांचे बेकायदा स्थलांतर
महा ई सेवा केंद्रांचे बेकायदा स्थलांतर

महा ई सेवा केंद्रांचे बेकायदा स्थलांतर

sakal_logo
By

महा ई सेवा केंद्र स्थलांतरामुळे
इचलकरंजीत नागरिकांचे हाल

इचलकरंजी, ता. २७ ः शहरातील अनेक महा ई सेवा केंद्रे आपल्या गरजेनुसार स्थलांतरित झाल्याने नागरिकांना पुन्हा शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे विविध कागदपत्रे सहज सुलभ उपलब्ध व्हावीत, तसेच शासकीय कार्यालयावर पडणारा कामाचा अतिरेक ताण कमी व्हावा, या उद्देशाने शासनाने महा ई सेवा केंद्राची निर्मिती केली होती. तसेच या केंद्रांना परवानगी देताना जीपीएसद्वारे त्यांचे ठिकाण निर्धारित केले होते. जेणेकरून नागरिकांची श्रम व वेळेची बचत व्हावी. मात्र, केंद्रे स्थलांतरित झाल्याने शासनाच्या उद्देशालच खीळ बसताना दिसत आहे.
नागरिकांना विविध शासकीय कागदपत्रे एजंटांच्या मध्यस्थीशिवाय वेळेत व कमी खर्चात मिळण्याकरिता शासनाने महा ई सेवा केंद्र ही डिजिटल सेवा २००८ पासून सुरू केली आहे. केंद्रांना परवानगी देताना जीपीएसद्वारे लोकेशन निर्धारित केले होते. शहरातील प्रत्येक भागामध्ये केंद्रांचे स्थान निर्धारित करून नागरिकांना कागदपत्राकरिता धावपळ करावी लागू नये, हा प्रमुख उद्देश होता. मात्र, सध्या शहरातील अनेक केंद्रे पुरवठा व अप्पर तहसील कार्यालय परिसरात स्थलांतरित झालेली दिसत आहेत, तर काही महा ई सेवा केंद्रे एजंटाच्या मार्फत भाडे तत्त्वावर घेऊन चालवली जात आहेत. केंद्रांचा परवाना एकाच्या नावावर व चालक दुसराच अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला पुन्हा कात्री लागत आहे.
महा ई सेवा व सीएससी केंद्रांमधून परवाने, सत्यता पडताळणी ७/१२ चा उतारा, रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, पेन्शन योजना अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे मिळण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिकांना कागदपत्रांकरिता रांगेत उभे राहण्यास लागू नये यासाठी प्रत्येक भागात दहा हजार नागरिकांच्या मागे एका केंद्रास परवानगी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, या केंद्र चालकांवर कोणतेच निर्बंध नसल्याने नागरिकांना पुन्हा कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

-------------------
शहरात ३३ सेवा केंद्रे
इचलकरंजी शहरात सुरुवातीस २३ महा ई सेवा केंद्रास परवानगी दिली होती. शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या विचारात घेता आणखी १० केंद्रांना शासनाने मंजुरी दिली होती. त्यामुळे शहरात एकूण डिजिटल सेवा केंद्रांची संख्या ३३ वर गेली आहे.
----------------
इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील महा ई सेवा केंद्रांची तपासणी केली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. जी महा ई सेवा केंद्रे निर्धारित लोकेशनवरून स्थलांतरित झाली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- शरद पाटील, अप्पर तहसीलदार, इचलकरंजी