
इचलकरंजीत पाच जलकुंभांसाठी १७ कोटी २४ लाखाचा निधी
इचलकरंजीत पाच जलकुंभांसाठी
१७ कोटी २४ लाखाचा निधी
इचलकरंजी, ता. १८ : इचलकरंजी शहरात नवीन पाच जलकुंभ उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ कोटी २४ लाखाचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील प्रस्ताव नगरोत्थान अंतर्गत तातडीने राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा, असे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
शहरासाठीचा नियमित पाणी उपसा, उपलब्ध पाणीसाठा आणि योग्य नियोजन याचा संपूर्ण मेळ घालून शहराला दररोज पाणी उपलब्ध होण्यासाठी शहरात पि. बा. पाटील मळा, जुना चंदूर रोड (दुर्गामाता मंदिरमागे), यशवंत कॉलनी, तुळजाभवानीनगर (शहापूर) आणि बाळकृष्णबुवा विद्या मंदिर (स्वामी अपार्टमेंटजवळ) असे नवीन पाच जलकुंभ उभारणीसाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आपण राज्य शासनाकडे केली होती. त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भातील १७ कोटी २३ लाख ६१ हजार ३११ रुपये खर्चाचा प्रस्ताव नगरोत्थान योजना अंतर्गत तातडीने पाठवून देण्यात यावा, असे लेखी आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या निधीमुळे लवकरच जलकुंभांची उभारणीसह योग्य ते नियोजन करुन शहराला दररोज पाणी उपलब्ध होणार आहे, असे आमदार आवाडे यांनी या वेळी सांगितले. कृष्णा नळपाणी योजनेची उर्वरीत जलवाहिनी बदलण्यासह जलकुंभ उभारणीसाठी शासनांने मंजुरी दिल्यांने शहरातील पाणी प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.