
ऊस तोड फसवणूक
इचलकरंजीत चौघा मुकादमांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी: ऊसतोड मजुरांच्या ५८ जोड्या देतो असे सांगून ४३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांजणावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील आहेत. याबाबतची तक्रार मुरलीधर ज्ञानदेव शिंदे (वय ४०, रा. खोतवाडी) व राजाराम परशुराम शिंदे (वय ५६, रा.तारदाळ) यांनी दिली आहे. पोपट वसंत सातपुते (वय २९, रा. शेंडगे - शिगाडे वस्ती ता.सांगोला, जि.सोलापूर), दीपक मोहन जावीर (२६, सावे, सोलापूर), सौरभ भरत कांबळे (२१, नंदेश्वर, मंगळवेढा) व बीरा लक्ष्मण अणुसे (२९, कोळेकर वस्ती, सांगोला) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सर्वजण ऊसतोड मजूर पुरविणारे मुकादम आहेत.पोपट याने ३० ऊसतोड मजुरीच्या जोड्या देतो, असे लेखी करार करून मुरलीधर यांचा विश्वास संपादित करत सोळा लाख रुपये, दीपक जावीर यांनी नऊ जोड्या देतो असे सांगून आठ लाख दहा हजार, सौरभ याने दहा जोड्या देतो असे सांगून अकरा लाख व बीरा अनुसे याने नऊ मजूर जोड्या देतो म्हणून आठ लाख दहा हजार असे एकूण चौघांनी ४३ लाख २० हजार रुपयांची वरील दोघांची फसवणूक केली आहे.